मुंबई : पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला एकाही राज्यात सत्ता स्थापन करण्यास यश आलेलं नाही. त्यानंतर विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाह या जोडगोळीवर तोंडसुख घेतलं आहे. 'सामना'च्या अग्रलेखातूनही शिवसेनेने भाजपचे कान टोचले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शाह जेमतेम काठावर आले आहेत आणि राहुल गांधी 'मेरिट'मध्ये चमकल्याचा निकाल लागला, असं 'सामना'त म्हटलं आहे.
'मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान ही हिंदी पट्ट्यांतील तीनही राज्ये भाजपच्या हातून निसटली आहेत. तेलंगणात पुन्हा चंद्रशेखर राव विजयी झाले. तिथेही भाजप काँग्रेसच्या खाली आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे की, मोदी आणि शाह यांनी 'काँग्रेसमुक्त भारता'चं जे स्वप्न पाहिलं होतं, त्याची धूळधाण भाजपशासित राज्यातच उडाली' अशा शब्दात 'सामना'तून शरसंधान साधलं आहे.
'जनतेनेच 'भाजपमुक्त'चा संदेश आता दिला आहे. पर्यायाच्या शोधात न फसता जनतेने जे नको ते मुळापासून उखडून टाकले. जनतेने उगाच हवेत उडणाऱ्यांना जमिनीवर उतरवले. जनतेच्या धैर्यास साष्टांग दंडवत!' असं म्हणत शिवसेनेने मतदारांचं कौतुक केलं आहे.
'भाजपला एकाही राज्याचं गणित धडपणे सोडवता आलं नाही आणि राहुल गांधी यांचा 'पेपर' कोरा आहे, असं ज्यांना वाटत होतं, त्यांची गणितं कोलमडली आहेत. पंतप्रधान मोदी, अमित शहा जेमतेम काठावर आले आहेत आणि राहुल गांधी 'मेरिट' म्हणजेच गुणवत्ता यादीत चमकल्याचा निकाल लागला' अशा भावना सामनातून व्यक्त करण्यात आल्या आहेत.
मध्य प्रदेशात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ, ज्योतिरादित्य शिंदे यांनी धूमशान केले आणि राहुल गांधींनी संपूर्ण राज्य ढवळून काढत भाजपचा रथ रोखला, अशा शब्दात काँग्रेसचं कौतुक करण्यात आलं आहे. राजस्थानात काँग्रेसचे सरकार बनण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. तिथे काँग्रेसला 140 च्या आसपास जागा मिळतील, असं वातावरण असताना मुख्यमंत्रीपदाच्या अंतर्गत लाथाळ्या आणि गटबाजीने काँग्रेसचा आकडा कमी झाल्याचं सामनात म्हटलं आहे. अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील संघर्षाने राजस्थानात काँग्रेस 100 जागांच्या थोडा पुढे जाऊन थांबला, असं 'सामना'त म्हटलं आहे.
मोदी-शाह काठावर पास, राहुल गांधी मेरीटमध्ये : सामना
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
12 Dec 2018 07:59 AM (IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शाह जेमतेम काठावर आले आहेत आणि राहुल गांधी 'मेरिट'मध्ये चमकल्याचा निकाल लागला, असं 'सामना'त म्हटलं आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -