भोपाळ : मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीचे अंतिम निकाल अद्याप स्पष्ट झाले नाहीत. काँग्रेस आणि भाजपमध्ये अद्यापही याठिकाणी काँटे की टक्कर पाहायला मिळत आहे. मात्र काँग्रेसने सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न सुरु केले आहेत.


सरकार स्थापनेचा दावा करण्यासाठी काँग्रेसने आज रात्री राज्यपालांना भेटण्याची वेळ मागितली आहे. एक फॅक्स आणि ई-मेलद्वारे काँग्रेसने राज्यपालांकडे भेटण्याची वेळ मागितली आहे. मात्र निवडणूक आयोगाकडून निवडणुकीचे सर्व निकाल स्पष्ट केले जातील, त्यानंतर वेळ देण्यात येईल, असं राज्यपाल कार्यालयाकडून सांगण्यात आलं आहे.





दुसरीकडे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना जल्लोष करण्यास आधीच सुरुवात केली आहे. मध्य प्रदेशमध्ये सकाळपासूनच काँग्रेस-भाजपमध्ये चढाओढ सुरू होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसचं अभिनंदन केल्याने मध्य प्रदेशात काँग्रेस सत्ता स्थापन करेल हे जवळपास निश्चित झालं आहे. या विजयानंतर काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण असून, राज्यात सर्वत्र जल्लोष सुरु आहे.


मध्य प्रदेशमध्ये आता मुख्यमंत्री कोण होणार या चर्चा रंगू लागल्या आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ आणि ज्योतिरादित्य शिंदे यांचं नाव त्याठिकाणी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आहे.