साकोली - लाखनी विधानसभा क्षेत्राचा विचार केला असता विद्यमान काँग्रेस नेते नाना पटोले यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. याच साकोली तालुक्यातील सुकळी हे विद्यमान काँग्रेस नेते नाना पटोले यांचे मुख्य गाव असून याच मतदार संघातून नाना पटोले यांनी विविध पक्षातून उमेदवारी लढवली आणि त्यात त्यांना यश देखील आले. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत नाना पटोले हे भाजपकडून खासदार म्हणून निवडून आले असताना त्यांचे निकटवर्तीय म्हणून समजले जाणारे राजेश काशिवार यांना भाजपतर्फे विधानसभा क्षेत्राची उमदेवारी देण्यात आली.


काँग्रेस नेते नाना पटोले यांच्या अगोदर माजी आमदार सेवक वाघाये पाटील यांनी सुद्धा सलग १० वर्षे या क्षेत्राचे आमदार म्हणून प्रतिनिधित्व केले आहे. मात्र २०१४ मध्ये या विधानसभा क्षेत्राचे चित्र पालटत भाजपने सत्ता काबीज केली. मतदारसंघात एकूण लोकसंख्येपैकी ४८ टक्के मतदार हे कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे. सिंचन व्यवस्था ही महत्वपूर्ण बाब मतदार संघाच्या दृष्टीकोनातून महत्वाची मानली जाते. इतर मतदारसंघाप्रमाणे या मतदार संघात देखील गेल्या ५ वर्षात विविध योजना राबविण्यात आल्या असून त्या योजनेचा लाभ येथील ग्रामीण व शहरी भागातील मतदारांना मिळाला असल्याचा दावा सत्ताधारी भाजपचे आमदार करत आहेत.


राष्ट्रीय महामार्ग तसेच लगतच असलेल्या नागझिरा अभयारण्य पर्यटन क्षेत्र लागून असल्यामुळे सुरवातीच्या काळापासून वन्यप्रेमी आणि पर्यटकांची या ठिकाणी गर्दी पाहायला मिळत असते. मात्र आज पर्यटन वाढले असले तरी स्थानिकांना पाहिजे त्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या नाहीत. तर याच तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग ६ च्या कडेला युती सरकारच्या काळात माजी मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी भेल प्रकल्प आणला. या प्रकल्पासाठी भूमिपूजन होऊन तसेच हजारो हेक्टर जमीन अधिग्रहित केली मात्र अजूनही प्रकल्प सुरु केला नाही. त्यामुळे अर्धवट पडलेला प्रकल्प कोण पूर्ण करणार आणि कोण रोजगार उपलब्ध करून देणार हा प्रश्न देखील आहे.


भंडारा जिल्ह्यात भंडारा ,तुमसर ,साकोली हे तीन विधानभा क्षेत्र असून तिन्ही विधानसभा क्षेत्रात भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत देखील देशात मोदी लाट असल्याने ती तिन्ही विधानसभा क्षेत्रासह लोकसभा क्षेत्रात देखील भारतीय जनता पक्षाला जागा मिळविण्यात यश आले होते. मात्र भाजप खासदार नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शेतकऱ्याचे प्रश्न एकूण घेत नसल्याचा आरोप करत भाजप खासदारकीचा राजीनामा दिला. त्यामुळे आता गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील राजकीय समीकरणं बदलण्याची चिन्हे आहेत. कारण प्रफुल्ल पटेल आणि नाना पटोले  या दोन्ही मात्तबर नेत्यांमुळे मतदारसंघात काँग्रेस राष्ट्रवादीला पुन्हा आशा निर्माण झाल्या आहेत.  मात्र असे असताना देखील २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे सुनील मेंढे हे तब्बल २ लक्ष मतांनी निवडून आले आहेत. त्यामुळे भाजपचं पक्षसंघटन जोरात असल्याचे दिसत आहे. त्यामुळे एकूणच भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघात चुरस असल्याचे चित्र आहे.


मुख्य समस्या :
- भेल प्रकल्प अपूर्ण हजारो हेक्टर शेती अधिग्रहित
- वाढती बेरोजगारी
- सिंचनाचा अभाव
-आरोग्य समस्या


जाणून घ्या या मतदारसंघाविषयी