बारामती: पुण्यातील हिंजवडीत आयटी पार्क काढले तसे मी बारामतीत आयटी पार्क काढणार आहे. ते माझं स्वप्न आहे, असे वक्तव्य बारामती विधानसभेचे उमेदवार युगेंद्र पवार यांनी केले. बारामती तालुक्यात युगेंद्र पवारांच्या प्रचारार्थ रोहित पवार सभा घेतली. बारामती तालुक्यातील सुपे येथे योगेंद्र पवारांनी दर्ग्यावर चादर चढवली आणि त्यानंतर छोटेखानी सभा घेतली. यावेळी युगेंद्र पवार यांनी जोरदार शा‍ब्दिक फटकेबाजी केली. 


साहेबांच्या आशीर्वादाने 30 वर्षे आपण दुसऱ्यांना संधी दिली, ते साहेबांना सोडून गेले. मला एकदा संधी देऊन बघा. तुम्ही थेट मला भेटू शकता. जर मला संधी दिली तर तुमची पुढची दिवाळी गोड होईल. काही जण मला म्हणतात मी नवीन आहे. कधीतरी सगळेच जण नवीन असतात. रोहित दादांना संधी दिली. त्यांनी शाश्वत विकास केला. संधी दिली म्हणून ते हे करू शकले, असे युगेंद्र पवारांनी म्हटले.


यावेळी युगेंद्र पवार यांनी महायुती सरकारवर टीकास्त्र सोडले. राज्य सरकारमधील लोक गुजरात सांगेल तसे निर्णय घेत आहेत. त्यांच्याविरोधात पवारसाहेब लढत आहेत. त्यामुळे साहेबांना आपण ताकद दिली पाहिजे. भाजप हा शेतकरीविरोधी पक्ष आहे. साहेब दिल्लीसमोर झुकले नाहीत. त्यामुळे त्यांचा पक्ष फोडला. आम्ही दोघे भाऊ पवार साहेबांच्या विचारला कधी सोडणार नाही, हा तुम्हाला शब्द देतो, असे युगेंद्र पवार यांनी सांगितले. 


राज्यात मविआचे 170 आमदार येतील: रोहित पवार


युगेंद्र माझ्यापेक्षा जास्त शिकला आहे. आमची तालीम एकच आहे, वस्ताद एकच आहे. युगेंद्रला बारामतीमधील अडचणी माहीत आहेत, आता त्या सोडवण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला नेल्याबद्दल एकही भाजप नेता बोलला नाही. अमित शहा यांना  एकानेही विचारलं नाही. योगी आले होते. त्यांच्या सभा खूप मोठ्या असतात. खुर्च्या जास्त लावायच्या आणि कमी माणसे येतात.अमित शाह यांनी लोकसभेमध्ये साहेबांना विचारलं होतं, दहा वर्षात तुम्ही काय केलं? लोकसभेला दाखवले की साहेबांनी काय केलं. कोल्हापूरला म्हणाले पुरावे द्या, 23 तारखेला पुरावा भेटेल. राज्यात आपले सरकार येईल, 170 पेक्षा जास्त आमदार आपले निवडून येतील, असा दावा रोहित पवार यांनी केला.


पैलवान खूप असतात, पण वस्ताद एकच असतो: रोहित पवार


देवेंद्र फडणवीस साहेब कसे पैलवान झाले काय माहिती? ते म्हणाले होते की पवार साहेबांचs राजकारण संपलं आहे. पैलवान खूप असतात वस्ताद एकच असतो. कुणी काय करायचं पण पवार साहेबांचा नाद करायचा नाय. देवेंद्र फडणवीस यांच्यासारखं या राज्यात कुणीच खोटं बोलत नाही. देवेंद्र फडणवीसांना आधुनिक अभिमन्यू म्हटले गेले, मला कळलं नाही ते गाणं का तयार केलं? परंतु अभिमन्यू हा चक्रव्युहात अडकला होता आणि महाराष्ट्रही अडकला आहे. त्यातून फक्त शरद पवार बाहेर काढू शकतात. आजच्या आधुनिक युगाचे जनरल डायर देवा भाऊ आहेत.


बारामतीत मोदींची सभा झाली पाहिजे. सदाभाऊ खोत हा देवेंद्र फडणवीस यांचा निष्ठावान कार्यकर्ता आहे. तो देवेंद्र फडणवीस यांच्या सारखाआहे.  तो इकडे येणार नाही. मोदींच्या दहा सभा दिल्यात तिथं 20 करा, अमित शहांच्या पंधरा दिल्यात त्या 30 करा अशी विनंती मी त्यांना केलेली आहे. त्यांनी सभा घेतल्यातर आपल्या जागा वाढतील. 2014 पासून आपला विकास कमी आणि गुजरातचा विकास जास्त झाला आहे.


मला जर स्वप्नात गृहमंत्री पद मिळालं तर 60 ते 70 टक्के महायुतीचे नेते गुवाहाटीला फिरायला जातील. मी इतक्या लोकांना अंगावर घेतलं आहे. पुरव्यनिशी घेतलं आहे. शाळेत, आदिवासी, दूध, mpsc या सगळयात यांनी पैसे खाल्ले आहेत, असा आरोप रोहित पवार यांनी केला.


आणखी वाचा


मीही निवृत्त होणार पण..; शरद पवारांचे नाव घेऊन अजित पवारांनी दिले संकेत, वारसदाराबद्दल काय म्हणाले?