Pune Bypoll election : कॉंग्रेसचा उमेदवार निवडून येणार नाही, (Pune Bypoll Election) मात्र आलाच तर पुण्येश्वर मंदिराबाबत धंगेकरांची भूमिका काय? कॉंग्रेसची भुमिका काय आहे?, असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) यांनी उपस्थित केला आहे. ते कसबा मतदारसंघाचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेत बोलत होते. 


कसब्याची लढाई राष्ट्रवादाची आणि हिंदुत्ववादाची आहे, असं वक्तव्यही त्यांनी केलं आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कसबा मतदारसंघ हा हिंदुत्ववादी आहे. या निवडणुकीत नाराजीनाट्य रंगल्याचा गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला. निवडणुकीत अनेक जातीयवादी गोष्टी परवण्याचादेखील प्रयत्न करण्यात आला. मात्र कसबा हा हिंदुत्ववादी आहे आणि तो राहणार आहे, असंंही ते म्हणाले. पुढे बोलताना ते म्हणाले की, आम्हाला पुण्याची संस्कृती जपायची आहे. द्वेषापेक्षा विकासाच्या कामावर आम्ही भर देणार आहोत. पुण्याचा चेहरा बदलण्याचं काम भाजप करत आहे. त्यामुळे आम्ही खुर्चा तोडण्यासाठी नाही तर खुर्च्या जोडण्याचं काम करत आहोत. लोकांनी भाजपला कामं करताना पाहिलं आहे. त्यामुळे कसब्याचाच नाही तर संपूर्ण पुण्याचा विकास होणार आहे, असंही ते म्हणाले.


राष्ट्रवादीच्या मंचावर विशिष्ट धर्मांना धक्कादायक आवाहन


शरद पवारांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत एक नेता जातीयवाद पसरवण्याचा प्रयत्न करतो. कसब्याच्या मतदानासाठी किंवा मोदींना हरवण्यासाठी परदेशातून लोकं आणा. मेलेली लोकं जिवंत करा, असं वक्तव्य तो नेता करतो. राष्ट्रवादीच्या मंचावर विशिष्ट धर्मांना धक्कादायक आवाहन केलं जातं. आम्ही तसं राजकारण करत नाही, असाही हल्लाबोल त्यांनी केला. 


एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनात दुटप्पी भुमिका घेण्यात आली, नवीन अभ्यासक्रम लागू करण्याचा निर्णय महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात घेण्यात आला.  मात्र त्यावेळी विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाची दखल घेण्यात आली नाही आणि आता आमच्यावर टिका केली, असाही आरोप देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर केला आहे.


'मुक्ता टिळक यांचे राहिलेले काम पूर्ण करणार'


पुण्याचा विकास हेच आमचं ध्येय आहे. पुण्यात मेट्रो सुरु केली. आता पुण्यात मेट्रोचा दुसरा टप्पा सुरु करणार आहोत. पुण्यात सुरु  झालेल्या ई-बसची चर्चा केंद्रात होते. ई-बसचा उपक्रम राबवा म्हणून अनेक राज्यांना सांगण्यात येतं. त्यामुळे पुण्याच्या विकासाची चर्चा आता महाराष्ट्रात नाही तर देशात होत आहे. पुण्याचा विकास भाजप करणार असल्य़ाचंही देवेंद्र फडणवीस म्हणाले. मुक्ता टिळक यांचे राहिलेले काम पूर्ण करण्यासाठी हेमंत रासने यांना विजयी करा, असं आवाहनही त्यांनी जनतेला केलं आहे.