मुंबई :  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. माजी खासदार राजू शेट्टी यांना मोठा धक्का बसला आहे. रविकांत तुपकर हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. रविकांत तुपकरांनी कालच घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असून मुख्यमंत्री आणि रविकांत तुपकरांमध्ये एक तास चर्चा झाली.







दरम्यान, राजू शेट्टी यांनी रविकांत तुपकर यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तुपकर यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शेतकरी चळवळीमध्ये आजपर्यंत दिलेल्या योगदानाबद्दल धन्यवाद. त्यांच्या भावी वाटचालीस स्वाभिमानी परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा !, असं शेट्टी यांनी म्हटलं आहे.



प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांचे खंदे समर्थक मानले जातात. त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा राजू शेट्टी यांच्याकडे सुपूर्द केला आहे. त्यांच्या राजीनाम्यामुळे स्वाभिमान शेतकरी संघटनेनेला विदर्भात मोठा धक्का बसला आहे. सदाभाऊ खोत यांनी स्वाभिमानीपासून काडीमोड घेतल्यानंतर तुपकर यांचे पक्षात वजन वाढले होते.




मी अनेक वर्षापासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये एक सक्रीय कार्यकर्ता होतो. माझ्याकडे पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी होती. परंतु आज मी माझ्या पदाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी आपल्या राजीनाम्यात म्हटले आहे.त्यांनी राजीनाम्यात नाराजीचे कारण स्पष्ट केले नसले तरी ते लवकरच भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.

लोकसभा निवडणुकीत बुलढाणा जिल्ह्यातून उमेदवारी मिळण्यासाठी माजी खासदार राजू शेट्टी यांनी आघाडीकडे  मागणी केली होती. परंतु फार आग्रह न धरल्याने सदर लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला सोडण्यात आला होता. त्यामुळे नाराज रविकांत तुपकर भाजपच्या गळाला लागले असल्याचे बोलले जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेली जवळीकता पाहता तुपकर भाजप प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. गेल्या चार दिवसांपासून तुपकर मुंबईत असल्याची माहिती असून लवकरच ते भाजपात प्रवेश करतील अशी माहिती देखील आहे.