जालना : लोकसभा निवडणुकीचा एक्झिट पोल (Lok Sabha Election Exit Poll 2024) काल समोर आले. यात देशात पुन्हा एकदा मोदी सरकार स्थापन होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यात एनडीला (NDA) 350 हून अधिक जागा मिळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर राज्यात महायुतीला फटका बसणार आहे. यावर केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
रावसाहेब दानवे म्हणाले की, आम्ही केरळ, आंध्र प्रदेश राज्यात जागा जिंकतोय. एखाद्या राज्यात कमी जास्त प्रमाण झाले असले तरी आम्ही इतर राज्यातून ते भरून काढतोय. एक्झिट पोलमध्ये आम्ही एका जागेने का होईना पुढे आहोत. मात्र, प्रत्यक्षात निकाल येतील तेव्हा भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्ष मिळून आम्ही नक्की 45 जागा जिंकू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
पावणेदोनशे जागा विधानसभेला जिंकू
शिंदेंना आणि अजित पवारांना सोबत घेण्याचा उद्देश सफल झालाय का? अशी विचारणा केली असता रावसाहेब दानवे म्हणाले की, भारतीय जनता पार्टीची जी मत आहेत ते शिवसेनेला आणि अजित दादाला ट्रान्सफर झाली आणि तिघांची मिळून आम्ही 45 चा आकडा सांगतोय. आमच्या तिघांच्या आकड्या फेरफार होऊ शकतो अजितदादांच्या आणि शिंदे यांच्या जागा वाढणार आहेत. या निकालाचे परिणाम नक्कीच येणाऱ्या काळात विधानसभेवर होतील. आम्ही सतर्क आहोत. या निवडणुका संपल्या की पुढच्या निवडणुकीच्या तयारीला आम्ही लागणार आहोत आणि या राज्यात पुन्हा आम्ही तिघे मिळून पावणेदोनशे जागा विधानसभेला जिंकू, असा दावा त्यांनी यावेळी केला आहे. विधानसभेच्या जागांसंबंधी आणि घटक पक्षांचे नेतृत्व एकत्र बसून सामूहिकरित्या निर्णय घेऊन कोणत्या पक्षाने किती जागा लढवायच्या हा निर्णय तेव्हाच होईल. अजितदादांच्या जागा जवळपास सर्वेच सर्व्हमध्ये कमी दाखवत आहेत? याबाबत रावसाहेब दानवे म्हणाले की, अजित दादांचे सर्व्हेमध्ये दाखवलं ते 100 टक्के खरं नाही, त्यात बराचसा बदल होईल.
सहानुभूती वगैरे काही नाही
उद्धव ठाकरेंच्या आणि शरद पवारांच्या बाबतीत सहानुभूती लाट होती का ? त्याचा कुठेतरी फटका तुम्हाला आणि तुमच्या मित्र पक्षांना बसला? असे विचारले असता दानवे म्हणाले की, ज्या शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केलं. त्या शरद पवारांनी स्वतःच्या पुस्तकामध्ये दोन ते अडीच वर्षात एकच दिवस मंत्रालयात आलेला मी पहिला मुख्यमंत्री पाहिला अस त्यांनी म्हटलं होतं. त्यांना जे चार दोन सीट वाढून मिळत आहेत. त्यांना शरद पवारांची आणि राजकीय पक्षाची मतं ट्रान्सफर झाली. अर्थात त्यांनी जास्त जागा लढल्या होत्या. जो पक्ष जास्त जागा लढेल त्याच्या जास्त जागा येतील, सहानुभूती वगैरे काही नाही, असे रावसाहेब दानवे यांनी म्हटले.
काँग्रेस-राष्ट्रवादी वाल्यांनी आमची मंदिराच्या बाबतीत टिंगल केली
राज्यात जागा कमी होण्याचे कारण या निवडणुकीमध्ये राष्ट्रीय स्तरावरील मुद्दे ग्राह्य धरले नाहीत का? किंवा इथले सामाजिक आंदोलन कारणीभूत होती का? असे विचारले असता रावसाहेब दानवे म्हणाले की, सार्वजनिकरित्या कोणी म्हणत नसलं तरी लोकांच्या मनामध्ये राष्ट्रीय मुद्दे होते. प्रभू रामचंद्रांच्या मंदिरासाठी हिंदू 500 वर्षे लढले. अनेक जण त्याच्यात हुतात्मे झाले. काँग्रेस-राष्ट्रवादी वाल्यांनी आमची मंदिराच्या बाबतीत टिंगल केली. राम मंदिर, 370 कलम यामुळे जागतिक पातळीवर देशाची उंचावलेली प्रतिमा या सगळ्या गोष्टी लोकांच्या मनात होत्या आणि त्या मतपेटीतून व्यक्त झाल्या, असे त्यांनी म्हटले.
मराठा आंदोलनाचा निवडणुकीत परिणाम झाला
मराठा किंवा ओबीसी आंदोलन याचे कुठेतरी भाजपला महाराष्ट्रामध्ये नुकसान झालेय का? यावर रावसाहेब दानवे म्हणाले की, मी ही गोष्ट मान्य करतो की याचा परिणाम महाराष्ट्रात काही ठिकाणी आणि मराठवाड्यामध्ये झाला. काही तरुणांच्या मनामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहीजे. याचा परिणाम या निवडणुकीत झाला हे मी मान्य करतो. मात्र, परिणामाचा फटका कोणाला बसतो हे निकालानंतर स्पष्ट होईल.
व्यक्तिगत स्वरूपाचे कोणाला आरोप करणं मला योग्य वाटत नाही
महराष्ट्रातील घटत्या जागांचं काही कारण आहे का? की आपसी मित्र पक्षातील व्यक्तिगत स्थानिक पातळीवरील मतभेद कारणीभूत झाली असतील? असे विचारले असता ते म्हणाले की, मी कोणा एकाच नाव घ्यावे, असा तुमचा उद्देश असेल तर ते त्यांच्या तोंडून तुम्ही घेतलेलं बरं. व्यक्तिगत स्वरूपाचे कोणाला आरोप करणं मला बरं वाटत नाही. त्यांचे त्यांचे इमान त्यांच्याजवळ, असे त्यांनी म्हटले.
एखाद्या नेत्याची नाराजी असू शकते हे राजकारण
अजितदादांच्या राष्ट्रवादीने किंवा शिंदेंच्या शिवसेनेने तुमचं काम केलं का? अशी विचारणा केली असता रावसाहेब दानवे म्हणाले की, मित्र पक्षाच्या कार्यकर्त्यांनी माझं काम केलं हे सूर्यप्रकाशापेक्षा स्वच्छ आहे. त्यातलं एखाद्या नेत्यांना काम केलं नसेल तर कार्यकर्त्याला मी दोष देणार नाही. एखाद्या नेत्याची नाराजी असू शकते हे राजकारण आहे. काहीतरी कारण असू शकतं नेत्यांनी जरी एखाद्या ठिकाणी काम केलं नसलं तरी कार्यकर्त्यांनी काम केलं आहे, असे त्यांनी म्हटले आहे. राज्य पातळीपासून गाव पातळीपर्यंत कार्यकर्त्यांनी काम केलं. भाजपने मित्रपक्षांचे काम केले. मित्र पक्षांनी भाजपचे काम केलं. एखाद्या नेत्याने काम केलं नसेल. तुमच्या मनात शंका असेल तर त्यांना जाऊन विचारा. जेवढा माझा राजकीय अनुभव आहे. तेवढे अनेकांचे वय नाही.
45 चा आम्ही दावा करतोय, निकालानंतर कळेल
भाजपच्या जागा घटण्यामध्ये कुठेतरी आपापसी मित्र पक्षाचे शिंदेंच्या शिवसेनेचे किंवा अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे मतभेद होते का? असे विचारले असता ते म्हणाले की, आमच्या जागा किंवा आमच्या मित्र पक्षाच्या जागा घटणार नाही. 45 चा आम्ही दावा करतोय. निकालानंतर ते तुम्हाला कळेल, असे त्यांनी म्हटले.
आणखी वाचा
जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा मला फायदा, बीडची निवडणूक वनसाईड, मी 100 टक्के जिंकणार : बजरंग सोनवणे