मुंबई : ऑपरेशन विखे पाटीलनंतर भाजपने आता ऑपरेशन मोहिते पाटील सुरु केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माढ्यातील खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.


रणजितसिंह मोहिते पाटील यांनी काल रात्री उशिरा जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या दोघांचीही ही पहिली भेट नव्हती. सुजय विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या दिवशीही रणजितसिंह मोहिते पाटील गिरीश महाजनांसोबत दिसले होते.

येत्या एक-दोन दिवसात रणजित सिंह मोहिते पाटील मुंबई मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं म्हटलं जात आहे.

VIDEO | अकलुजमध्ये विजयसिंह मोहिते पाटलांनी बोलावली बैठक | ब्रेकफास्ट न्यूज | एबीपी माझा



सुजय विखेंपाठोपाठ रणजितसिंह मोहिते पाटीलही भाजपच्या गळाला?

दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही यादीत मोहिते-पाटलांचं नाव नव्हतं. त्यामुळे मोहिते पाटील कुटुंबामध्ये अस्वस्थता आहे. याच निमित्ताने विजयसिंह मोहिते-पाटलांनी आज अकलूजमध्ये महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे. या बैठकीला मोहिते पाटील समर्थक या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. मोहिते-पाटील या बैठकीनंतर काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं असेल.

या सर्व पार्श्वभूमीवर रणजितसिंह पाटील यांची पोस्ट अतिशय बोलकी आहे. ते लिहितात, "सर्वसामान्य जनता हेच आपले स्वतःचे कुटुंब मानून गेली अनेक वर्षे काम करताना येथील आपल्यासारखा कार्यकर्ता हाच मार्गदर्शक मानला आहे. आपल्या सर्वांच्या विचारांनीच आजवरची प्रत्येक दिशा ठरवली आहे. तुमचा निर्णय हाच माझा निर्णय असेल. सांगा कसं करायचं....असचं सहन करत राहायचं... का पेटून उठायचं... आपल्या प्रगतीसाठी...विकासासाठी..... आपल्या सर्वांच्या भवितव्यासाठी.......ठरवायचयं... तुमच्या साक्षीने....तुमच्या साथीने... या मग.... मोहिते पाटील कुटुंबावर प्रेम करणाऱ्या सर्व कार्यकर्ते यांना विनंती आज दुपारी ठिक-3:00 वाजता शिवरत्न बंगला अकलूज येथे उपस्थित राहावे ही नम्र विनंती.आपला मोहिते-पाटील परिवार