मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाला दोन जागा हव्या आहेत. आठवले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे याबाबत मागणी केली आहे. दक्षिण मुंबईची जागा हातून निसटल्यानंतर आठवले यांनी मुख्यमंत्र्यांकडे ईशान्य मुंबई मतदार संघाची मागणी केली आहे.


आठवले याबाबत म्हणाले की, "मी याआधी दक्षिण मुंबईतून निवडणूक लढलो होतो, त्यामुळे माझा आग्रह होता की, मला पुन्हा एकदा याच मतदार संघातून निवडणूक लढू द्यावी. परंतु आता मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ईशान्य मुंबईची जागा मागितली आहे. मुख्यमंत्र्यांनी मला शब्द दिला आहे, की तुम्हाला न्याय देऊ."

आठवले यांनी मुख्यमंत्र्यांकडे लोकसभेच्या किमान दोन जागा मिळाव्या अशी मागणी केली आहे. आठवले म्हणाले की, "आमच्या पक्षाला शिवसेना आणि भाजपने दोन जागा द्याव्या. केंद्रात आणि राज्यात दोन मंत्रीपदं द्यावीत. शिवसेना आणि भाजपने लक्षात घ्यायला हवं की युतीमधले घटकपक्ष हे केवळ त्याग करण्यासाठी नाहीत."