मुंबई : मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी यावेळच्या विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी ही निवडणूक लढवण्याचे ठरवून वेगवेगळ्या मतदारसंघांतून उमेदवार देणार असल्याचं सांगितलं होतं. मात्र आता त्यांनी अनपेक्षितपणे आम्ही ही निवडणूक लढवणार नाहीत, असं म्हटलंय. मित्रपक्षांच्या उमेदवारांची यादी न आल्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला आहे, असं कारण जरांगे यांनी दिलंय. दरम्यान जरांगे यांचा हा दावा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया 1956 या पक्षाचे अध्यक्ष राजरत्न आंबेडकर (Rajratna Ambedkar) यांनी खोडून काढला आहे.
जरांगे यांच्या निर्णयाचा आम्ही आदर करतो
आम्ही अगोदरच जरांगे यांना आमच्या उमेदवारांची यादी दिली होती, असं राजरत्न आंबेडकर यांनी सांगितलं आहे. "मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषद घेऊन आम्ही ही विधानसभा निवडणूक लढवणार नाहीत, असं जाहीर केलं. आम्ही त्यांच्या या निर्णयाचा आदर करतो. निवडणूक लढायची किंवा न लढायची हा निर्णय त्यांचा होता. आम्ही त्यांना याबाबतचा अधिकार दिला होता. आम्ही त्यांच्या निर्णयाच्या विरोधात जाणार नाहीत," असे राजरत्न आंबेडकर यांनी सांगितले.
निवडणूक लढवणं हा आमचा उद्देश नाही
"मात्र जरांगे यांनी निवडणूक न लढवण्याचं जे कारण दिलं आहे, त्यामुळे मराठा, दलित, बौद्ध, मुस्लिमांत एक संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे. हाच संभ्रम दूर करण्यासाठी मी ही पत्रकार परिषद आयोजित केली आहे. माध्यमांनी माझी ही भूमिका मराठा, मुस्लीम मतदारांपर्यंत पोहोचवावी. कारण निवडणूक लढवणं हा आमचा उद्देश नाही. आमच्यासाठी समाजातील एकता महत्त्वाची आहे," असं स्पष्टीकरण राजरत्न आंबेडकर यांनी दिलं.
एकमेकांचे उमेदवार अगोदरपासूनच माहिती होते
"आज दलित, मराठा आणि सुस्लीम यांच्यातील युती हे समीकरण आज गावा-गावात जाऊन पोहोचलं आहे. या समीकरणाराल धक्का लागू नये यासाठी मी हे स्पष्टीकरण देत आहे. आज मला अनेक मराठा समाजातून फोन कॉल्स येत आहेत. तुम्ही उमेदवारांची यादी का दिली नाही? अशी विचारणा केली जात आहे. दलित आणि मुस्लीम नेत्यांनी त्यांच्या उमेदवारांची यादी माझ्याकडे दिलेली नाही. त्यामुळेच आम्ही निवडणूक लढवत नाहीयोत, असं जरांगे यांनी सांगितलं आहे. मात्र हे कारण नाही. एकमेकांना एकमेकांचे उमेदवार अगोदरपासूनच माहिती होते. उमेदवारांच्या यादीची देवाणघेवाण अगोदरच झालेली होती. कोणकोणत्या जागांवर उमेदवार बदलायला हवे होते, यावरही चर्चा झाली होती. मुस्लीम, बौद्ध, दलित समाजाच्या उमेदवारांची यादी अगोदरच दिलेली होती," असे स्पष्टीकरण राजरत्न आंबेडकर यांनी दिले आहे.
यादी न मिळणे हे निवडणूक लढवण्याचे कारण नाही
निवडणूक लढवायची की नाही, हा निर्णय मनोज जरांगे यांचा आहे. आम्ही त्यांच्या या निर्णयाचे समर्थन करतो. मात्र मराठा समाजाच्या मनात कोणताही भ्रम राहू नये किंवा त्यांच्या मनात कोणता द्वेष निर्माण होऊ नये म्हणून मी हे स्पष्टीकरण देत आहे. आमची झालेली ही मैत्री तुटू नये म्हणून मी आज ही पत्रकार परिषद घेत आहे. उमेदवारांची यादी न मिळणे हे निवडणूक लढवण्याचे कारण नाही. मनोज जरांगे यांच्यावर कोणाचा दबाव आहे का? याबाबत मला माहिती नाही, असेही राजरत्न आंबेडकर यांनी सांगितले.
दरम्यान, राजरत्न आंबेडकर यांच्या या भूमिकेमुळे अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. मनोज जरांगे यावर काय स्पष्टीकरण देणार? हे महत्त्वाचे ठरणार आहे.
हेही वाचा :
मोठी बातमी! मनोज जरांगेंकडून विधानसभा निवडणुकीतून माघार, एकही उमेदवार उभा करणार नाही