Ashok Gehlot on Rajasthan Congress CM Face: राजस्थानचे (Rajasthan Assembly Election 2023) मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांना राजकारणासोबतच वास्तविक जीवनातही जादूगार म्हटलं जातं. काँग्रेस (Congress) कार्यकर्ते आणि दिल्लीतील पक्षश्रेष्ठी यांच्याकडून कधी आणि कोणती गोष्ट मान्य करुन घ्यायची, हे गेहलोतांना अगदी व्यवस्थित जमतं, अशी चर्चा राजकीय वर्तुळात नेहमीच रंगल्याचं पाहायला मिळतं. याचंच उदाहरण द्यायचं झालं तर सध्या गेहलोतांच्या एका भूमिकेमुळे राजस्थानच्या राजकीय वर्तुळात आणि विशेषतः राजस्थान काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे. काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडून निर्णय येण्यापूर्वीच अशोक गेहलोत यांनी स्वतःला पुढचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित केलं आहे.
दरम्यान, राहुल गांधींनी काही दिवसांपूर्वी बोलताना राजस्थानमध्ये स्थिती नाजूक असल्याचं सांगितलं होतं, त्यामुळे या पार्श्वभूमीवर अशोक गेहलोतांच्या मनात नेमकं काय शिजतंय हे येणारा काळच सांगेल.
अशोक गेहलोत हे सातत्यानं सांगत आहेत की, त्यांना मुख्यमंत्रीपदी राहायचं नाही, पण यावेळी ते तीच वाक्य अशा काही पद्धतीनं बोलले की, काँग्रेस पक्षश्रेष्ठीही आश्चर्य चकीत झाले आहेत. राजस्थानमध्ये काँग्रेस पुन्हा सत्तेत आली तर यावेळी मुख्यमंत्री चेहरा कोण असेल? या चर्चांनी सध्या राजकीय वर्तुळात जोर धरला आहे. काँग्रेसचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कोण? हे जाणून घेण्याची राजस्थानच्या जनतेला प्रचंड उत्सुकता आहे. आता अशोक गेहलोत यांनी पक्षाच्या संमतीशिवाय त्यांच्या वतीनंच याचं उत्तर देऊन टाकलं आहे. मला मुख्यमंत्री व्हायचं नाही, पण ही खुर्चीच मला सोडायला तयार नाही आणि सोडणारही नाही, असं अशोक गेहलोत म्हणाले आहेत. दरम्यान, काँग्रेसकडून अद्याप अशोक गेहलोत यांना मुख्यमंत्रीपदाचा दावेदार म्हणून घोषित केलेले नाही.
अशोक गेहलोत यांना पक्षावर दबाव आणायचाय?
अशोक गेहलोत यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळातच खळबळ उडाली आहे. गेहलोतांच्या वक्तव्यानंतर ते पक्ष हायकमांडवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत असल्याचं बोललं जात आहे. तसेच, जर आगामी विधानसभा निवडणूक काँग्रेसनं जिंकली आणि गेहलोतांना मुख्यमंत्रीपद नाही मिळालं तर राजस्थानमध्ये काँग्रेसला मोठं नुकसान सहन करावं लागेल, असा इशाराही गेहलोतांनी पक्षश्रेष्ठींना दिल्याचं बोललं जात आहे.
राजकारणात अशोक गेहलोत यांची 'जादू' का प्रसिद्ध?
अशोक गेहलोत यांच्या जादूची अनेक दिवसांपासून सर्वत्र चर्चा आहे. अशोक गेहलोत नेहमीच म्हणतात की, सचिन पायलट आणि त्यांच्यात खूप प्रेम आहे. परंतु, त्यांनी घेतलेल्या निर्णयानंतर अनेक गोष्टी स्पष्ट होतात. 2018 च्या निवडणुकीत सचिन पायलट राजस्थानचे प्रदेशाध्यक्ष होते. अशातच सर्वांनाच असं वाटत होतं की, राजस्थानमध्ये काँग्रेसची सत्ता आल्यानंतर मुख्यमंत्रीपदी सचिन पायलटच विराजमान होतील. पण तेवढ्यात अशोक गेहलोतांनी आपली जादूची कांडी फिरवली आणि थेट मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर विराजमान झाले.
काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या शर्यतीतही अशोक गेहलोत यांचं नाव आघाडीवर होतं. पण, त्यांना राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदाची खुर्ची सोडायची नव्हती. अशा परिस्थितीत त्यांनी पक्षाच्या हायकमांडवर जादू केली आणि नम्रपणे अध्यक्षपद नाकारलं. असं करत असतानाही सचिन पायलट यांनाही सोयीस्करपणे मुख्यमंत्रिपदाचे दावेदार म्हणून पुढे जाऊ दिलं नसल्याचं बोललं जात आहे.