नांदेड : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज नांदेडमध्ये सभा पार पडली. मुंबईतील शिवतीर्थावरील सभेनंतर राज ठाकरेंनी आज पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला. गेली साडेचार वर्ष मोदींनी जनतेची फसवणूक केल्याचा आरोपही राज ठाकरेंनी केला.
जनतेच्या दृष्टीने महत्त्वाच्या मुद्द्यांवर नरेंद्र मोदी आपल्या निवडणूक प्रचार सभांमध्ये बोलतच नाहीत. पंडित नेहरु, इंदिरा गांधी यांच्यावर केवळ आरोप करताना मोदी दिसत आहेत. मात्र बेरोजगार, महिला सुरक्षा, शेतकरी आत्महत्यांबद्दल अशा महत्त्वाच्या मुद्द्यांवर नरेंद्र मोदी कधी बोलणार असा सवाल राज ठाकरेंनी विचारला.
नरेंद्र मोदी, अमित शाह ही दोन नावं बाजूला जाण आवश्यक
गाफील राहू नका, मी कोणाचाही प्रचार करायला आलेलो नाही. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे, या देशाच्या राजकीय क्षीतिजावरुन नरेंद्र मोदी आणि अमित शाह ही दोन नावं बाजू जाणं ही या निवडणुकीमध्ये अत्यंत आवश्यक आणि गरजेचं आहे. या गोष्टीसाठी तुम्हा सगळ्यांना मतदानासाठी उतरायचं आहे आणि तुमचं जो कोणी मित्रपरिवार असेल, जे कोणी नातेवाईक असतील, त्यांना सांगा जे झालं ते झालं, तो झाला भूतकाळ. एक नवा भविष्यकाळ घडवायला जाऊया. ही माणसं नकोत. जे येईल त्याचं आपण स्वागत करु.
गोदावरीचं पाणी गुजरातला वळवलं जातंय
राज्यातील 151 तालुक्यातील जवळपास 24 हजार गावांत दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. राज्यात पाण्याची स्थिती गंभीर आहे, मग तुम्ही पाण्यासाठी काय उपाययोजना केल्या, असा सवाल राज ठाकरेंनी सरकारला विचारला. एकीकडे महाराष्ट्र गोदावरीच्या पाण्यासाठी भांडत आहे आणि दुसऱ्या मार्गाने गोदीवरीचं पाणी गुजरातला वळवलं जात आहे, असा आरोप राज ठाकरेंनी केला. मात्र यावर आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एक शब्दही बोलत नाही, असं राज ठाकरे यांनी म्हटलं.
नेहरु, गांधी कुटुंबावरील टीकेचा समाचार
पंतप्रधान मोदी आपल्या भाषणात नेहरु, गांधी कुटुंबावर कायम टीका करतात. याच मुद्द्यावर राज ठाकरे यांनी मोदींचा खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले की, "ज्याचा संबंध नाही, अशा गोष्टी निवडणुकीच्या तोंडावर बोलतात. कशाचा कशाशी संबंध नाही असं बोलतात. संपूर्ण निवडणूक नेहरुंना शिव्या घाल, इंदिरा गांधींना शिव्या घाल. पण तुमच्या कामाबद्दल कधी बोलणार? बेरोजगार तरुणांबद्दल कधी बोलणार? महिला सुरक्षेबद्दल कधी बोलणार? शेतकरी आत्महत्येबद्दल कधी बोलणार? तुम्ही नेहरु, इंदिरा गांधींबद्दल काय बोलता, याचं आम्हाला काय करायचं?
नेहरुंच्या वाक्यावरुनच मोदींचं प्रधानसेवक!
मोदींनी जे प्रधानसेवक आणलं, ते वाक्यही जवाहरलाल नेहरुंचं आहे. दिल्लीतल्या स्मृती भवनमध्ये मोठी पाटी आहे, त्या पाटीवर पंडित नेहरुंचं वाक्य लिहिलं आहे. फक्त त्यांनी वेगळा शब्द वापरला आहे. नेहरुंचं वाक्य असं आहे, यह देश की जनता मुझे प्रधानमंत्री कहके ना पुकारे, इस देश की जनता मुझे प्रथमसेवक कहके बुलाए. ते प्रथमसेवक यांनी प्रधानसेवक केलं.
मोदींना चुकीचा इतिहास माहित
"मध्यंतरी एका दक्षिणेतील राज्यात भाषण करताना मोदींनी नेहरुंचा विषय काढला. मोदी म्हणाले होते की शहीद भगतसिंह जेलमध्ये असताना नेहरु परिवारातील कोणी त्यांना भेटायला का नाही गेला? आता गोष्टीचा निवडणुकांशी काय संबंध? रोजच्या जगण्याशी याचा काय संबंध आहे? एकतर मोदींना चुकीचा इतिहास माहित आहे. 1929 सालच्या ट्रिब्यून या वर्तमानपत्रात छापलेल्या बातमीनुसार, पंडित नेहरु हे एकमेव व्यक्ती जे भगतसिंहांना जेलमध्ये दोनदा भेटून, त्यांची विचारपूस करुन आले. आता काँग्रेसी परिवार म्हणजे कोण? तर नेहरुच ना, मग ते दोनदा जाऊन आले. शहीद भगतसिंह जेलमध्ये असताना इंदिराजी 14 वर्षांच्या होत्या, म्हणजे भगतसिंहांना जेलमध्ये जाऊन भेटणं हा विषयच नाही. त्यामुळे राजीव गांधी, संजय गांधी, सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी पत्ताच नाही. आता इंदिराजीच 14 वर्षांच्या होत्या तर बाकीच्यांचा विषयच येत नाही."
शहिदांच्या नावावर मत मागताना लाज नाही वाटत का?
नरेंद्र मोदी शहीद जवांनाचा स्वत:च्या स्वार्थासाठी वापर करत असल्याचा आरोप राज ठाकरेंनी केला. बालाकोट हवाई हल्ल्यात किती दहशतवादी मारले गेले याचा आकडा हवाई दलाच्या प्रमुखांकडे नाहीत, पण अमित शाह म्हणाले 250 जण मारली गेली. अमित शाहांना कुठून मिळाला हा आकडा? असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला.
योगी आदित्यनाथ म्हणाले देशाची सेना मोदींची सेना आहे. आज मोदी नवीन मतदारांना आवाहन करतायेत की तुमचं पहिलं मत हे बालाकोटचा एअरस्ट्राईक करणाऱ्या सैन्यसाठी, पुलवामाच्या वीर शहिदांसाठी द्या. जवानांच्या नावावर मत मागताना लाज नाही वाटत? असा संताप राज ठाकरेंनी व्यक्त केला. देशाला दाखवलेल्या स्वप्नांच्या जीवावर का मते मागण्याऐवजी शहीद जवानांच्या नावावर का मते मागता? असा सवाल राज ठाकरेंनी विचारला.
यावेळी नरेंद्र मोदींच्या भाषणाची एक क्लिपही राज ठाकरेनी दाखवली. त्यात सैनिकांच्या साहसापेक्षा व्यापाऱ्यांचं साहस मोठं असतं, असं मोदी म्हणाले होते. मोदींच्या या वक्तव्यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले की, व्यापारी पण असले दावे करत नाहीत, पण मोदींच्या मनात जवानांबद्दल काय भावना आहेत हे दिसत आहे.
राज ठाकरे यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
- देशातील प्रत्येक नागरिकाला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फसवलं- राज ठाकरे
- मोदींच्या पायाखालची वाळू सरकली आहे- राज ठाकरे
- मराठवाड्यात हजारो फूट खोल पाणी लागत नाहीये, ही परिस्थिती अशीच राहिली तर मराठवडायचं वाळवंट होईल - राज ठाकरे
- देवेंद्र फडणवीस म्हणतात महाराष्ट्रात एक लाख 20 हजार विहिरी खोदल्या. कुठे आहेत त्या विहिरी?- राज ठाकरे
- नरेंद्र मोदी नेहमीच इलेक्शन मोडमध्ये असतात- राज ठाकरे
- नरेंद्र मोदींनी जेवढी आश्वासनं दिली, त्यावर एक शब्द आज ते बोलत नाहीत- राज ठाकरे
- नरेंद्र मोदींच्या भाषणातून शेतकरी, विकास, रोजगार हे विषय गायब- राज ठाकरे
- 4 वर्षापूर्वी बोललो होतो की निवडणुकीच्या तोंडावर नरेंद्र मोदी युद्धसदृश्य परिस्थिती निर्माण करतील. ते आज खरं ठरतंय- राज ठाकरे
- नोटबंदीमुळे जवळपास 4 कोटी लोक बेरोजगार झाले, पण या विषयावर मोदी बोलायला तयार नाहीत- राज ठाकरे
- भारतीय लष्कराचा मोदी स्वत:च्या स्वार्थासाठी वापर करत आहेत- राज ठाकरे
- नरेंद्र मोदी देशाला दाखवलेल्या स्वप्नांच्या जीवावर का मत मागत नाहीत? शहीद जवानांच्या नावावर का मत मागत आहेत?- राज ठाकरे
- आधी मोदींनी एफडीआयला विरोध केला आणि नंतर सत्तेत आल्यानंतर एफडीआय 100 टक्के केलं- राज ठाकरे
- मोदी पंडित नेहरु, इंदिरा गांधींबद्दल बोलत आहेत. बेरोजगार, महिला सुरक्षा, शेतकरी आत्महत्यांबद्दल कधी बोलणार?- राज ठाकरे
- मोदी स्वत:ला प्रधानसेवक बोलतात, पण त्यांनी हा शब्द पंडित जवाहरलाल नेहरुंचाच घेतला - राज ठाकरे
- जनेतेने मोठ्या अपक्षेने देश यांच्या हातात दिला, पण हा माणूस थापा मारत राहिला - राज ठाकरे
- मन की बात ही कल्पना मुळात हिटलरची आहे- राज ठाकरे
- महाराष्ट्र गोदावरीच्या पाण्यासाठी भांडत आहे, तर दुसऱ्या मार्गाने गोदावरीचं पाणी गुजरातला वळवण्याचा घाट घातला जात आहे- राज ठाकरे
- गोदावरीचं पाणी गुजरातला वळवल जातंय, त्यावर मुख्यमंत्री गप्प आहेत- राज ठाकरे
- बीडमध्ये महिलांचं गर्भाशयं विकली जात आहेत, चौकीदार करतो काय?- राज ठाकरे
- राज ठाकरेंच्या सभेत लोकांकडून 'चौकीदार चोर है'ची घोषणाबाजी
- नरेंद्र मोदी आणि अमित शाह ही दोन नावं या निवडणुकीनंतर बाजूला जाणं गरजेचं आहे- राज ठाकरे