नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमधील सुलतानपूरमधील भाजपच्या लोकसभेच्या उमेदवार मनेका गांधी यांच्या भाषणाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत त्या मुस्लीम समुदायाला मतदान करण्याचं आवाहन करत आहेत. तसेच तुम्ही मला मतदान नाही केलं तर तुमची कामे करताना मला विचार करावा लागेल, असंही त्यांनी म्हटलं आहे. मनेका गांधी यांच्या या व्हिडीओमुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.


मनेका गांधी यांनी आपल्या भाषणात म्हटलं की, मी लोकसभा निवडणुकीत लोकांच्या सहकार्याने मी निश्चित जिंकणार आहे. मात्र माझा विजय मुस्लीम जनतेशिवाय असेल तर मला वाईट वाटेल. ज्यावेळी मुस्लीम नागरिक कामानिमित्त माझ्याकडे येतात, त्यावेळी मला विचार करावा लागतो. माझा निवडणुकीतला विजय तुमच्या सहकार्यानेही होईल आणि तुमच्या सहकार्याशिवायही होईल, याचा प्रचार तुम्हाला सगळीकडे करावा लागेल.



"मी मैत्रीचा हात पुढे केला आहे. मी पिलिभीतमध्ये कसं काम केलं आहेत, तेथील लोकांना विचारा. मी चांगलं काम केलं नसेल तर मला मतदान करु नका. मी जिंकणारच आहे, त्यामुळे तुम्हाला माझी भविष्यात गरज पडणार आहे", असं वक्तव्य मनेका गांधी यांनी केलं.


मनेका गांधी यंदा आपल्या पारंपरिक मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात नाही. मुलगा वरुण गांधी यांच्या सुल्तानपूर मतदारसंघातून त्या मैदानात उतरल्या आहेत. तर वरुण गांधी मनेका यांच्या पिलीभितमधून वरुण गांधीना तिकीट देण्यात आलं आहे.