मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एकही उमेदवार लोकसभा निवडणूक लढवत नसताना राज ठाकरे महाराष्ट्रभर प्रचार सभा घेत आहेत. मग राज ठाकरे यांच्या जाहिर प्रचार सभा कोणासाठी आहेत? आणि या जाहीर प्रचार सभांचा खर्च कोणत्या उमेदवाराच्या खर्चामध्ये दाखवायचा? यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण द्यावं, अशी मागणी भाजपा महाराष्ट्राच्या लोकसभा निवडणूक व्यवस्थापन समितीतर्फे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केली आहे.
या संदर्भात राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी अश्वनी कुमार यांना विनोद तावडे यांनी पत्र लिहिलं आहे. राज ठाकरे महाराष्ट्रात प्रचार सभा घेत आहेत. या सभांमधून राज ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पराभूत करा आणि राहुल गांधी, शरद पवार यांच्या पक्षांच्या उमेदवारांना निवडून द्या असं आवाहन जनतेला करत आहेत. हा प्रचार काँग्रेस–राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा होत आहे. या प्रचार सभांचा खर्च कोणताच उमेदवार आपल्या निवडणूक प्रचार खर्चात दाखवत नाही. निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे हा खर्च कोणाच्या खात्यात दाखविला पाहिजे, हे स्पष्ट होत नाही, असं विनोद तावडेंनी आपल्या पत्रात लिहिलं आहे.
त्यामुळे राज ठाकरेंच्या प्रचार सभांचा खर्च दाखवणार कसा, असा प्रश्न उपस्थित केला जाऊ शकतो. राज ठाकरेंचा प्रचार पूर्णपणे राजकीय आहे. त्यामुळे आमचे असे मत आहे की, त्या ठिकाणच्या काँग्रेस-राष्ट्रवादी लोकसभा उमेदवारांच्या निवडणूक खर्चात हा खर्च दाखविणे गरजेचे आहे, असं विनोत तावडेंनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.
राज ठाकरे यांच्या प्रचाराला परवानगी देण्यापूर्वी ते लोकसभा निवडणुकीत कोणत्या उमेदवाराच्या प्रचारासाठी ही सभा घेत आहेत याचंही स्पष्टीकरण घ्यावे, अशी विनंती विनोद तावडेंनी पत्रात केली आहे.
UNCUT | नांदेडमध्ये राजगर्जना, राज ठाकरेंचं नांदेडच्या सभेतील संपूर्ण भाषण