पिंपरी-चिंचवड : अविवाहित वर्गाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी तरी पार्थला निवडून द्या, असं आवाहन अजित पवार यांनी केलं आहे. पिंपरीत आयोजित विद्यार्थी मेळाव्यात ते बोलत होते. लोकसभेत काही अविवाहित खासदार ही हवेत. अविवाहित वर्गाचं प्रतिनिधित्व करणारा सदस्य ही लोकसभेत असायला हवा, असं अजित पवारांनी म्हटलं. तर कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही, असं म्हणत त्यांनी साक्षी महाराजांवरही टीका केली.


लोकसभेत अविवाहितांचे प्रश्न मांडणार खासदार असायला हवाच, त्यांच्याही अनेक समस्या आहेत. त्यामुळे अविवाहित पार्थ पवार निवडून जावा, म्हणून हा खटाटोप सुरु असल्याचं अजित पवार म्हणाले.


केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचं शिक्षण बारावी आणि त्या विद्यापीठाच्या बॉस आहेत. हा दाखला देत मावळ युतीचे श्रीरंग बारणे हे दहावी नापास उमेदवार असण्याकडे पवारांनी बोट दाखवलं. त्यामुळे उच्चशिक्षित पार्थ पवारांना निवडून देण्याचं आवाहन अजित पवारांनी केलं.


कावळ्याच्या शापाने गुरे मरत नाहीत 


मला मतदान न केल्यास शाप देईन असं म्हणणाऱ्या साक्षी महाराज आणि मीच देव आहे असं म्हणणाऱ्या सोलापूर लोकसभेतील युतीचे जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांची अजित पवारांनी खिल्ली उडवली. कावळ्याच्या शापाने गुरे मरत नाहीत, तेव्हा अशा शापांना घाबरु नका, असं आवाहन ही केलं.


जळगावमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांनी मंचावर केलेली हाणामारी आणि अहमदनगरमध्ये विद्यमान खासदार दिलीप गांधी यांना भाषणापासून रोखणं यामुळे भाजप पक्षाची हुकूमशाही, दडपशाही चव्हाट्यावर आली आहे. यामुळे पक्षाची अब्रू जाते. तेव्हा पद मिळाल्यावर नीट वागा, असा सल्ला पवारांनी दिला.