नवी मुंबई : शिवसेना पाच वर्ष सत्तेत राहून आता म्हणत आहे 'हीच ती वेळ', पाच वर्ष वेळ नव्हता का तुम्हाला? असा सवाल करत  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना भाजपवर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी शिवसेना भाजपच्या जाहिरातबाजीवर टीका केली.  भाजप म्हणतं हे आपलंच सरकार, मात्र कुणी ठरवलं आपलं सरकार? असा टोलाही त्यांनी लगावला. नेरुळमध्ये गजानन काळे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते.


पाच वर्षे ज्यांनी विविध आश्वासनं देऊन तुम्हाला फक्त थापा मारल्या आज तेच सत्ताधारी तुमच्याकडे मतं मागायला कसे येतात? त्यांना मतं मागताना लाज कशी वाटत नाही? असा सवाल देखील अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला.  राज ठाकरे म्हणाले की, मनसेमुळे राज्यातले 78 टोलनाके बंद झाले. मी सत्तेच्या बाहेर राहून हे करु शकलो मग सरकार आश्वासन देऊनही हे का करु शकलं नाही? त्यांना कुणी जाब का विचारत नाही असा प्रश्न राज ठाकरेंनी विचारला.

मी भूमिपुत्रांचे प्रश्न मांडले तेव्हा माझ्यावर आणि माझ्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले. गुजरातमध्ये अल्पेश ठाकोरने तिथल्या भूमिपुत्रांसाठी आंदोलन करुन 20 हजार लोकांना मारहाण करून बाहेर हाकलवलं,  मात्रा नंतर त्याच अल्पेश ठाकोरला गुजरातमध्ये सन्मानाची वागणूक मिळाली, भाजपात प्रवेशही मिळाला, असेही ते म्हणाले. परप्रांतीय लोकांमुळे राज्यावरचं ओझं वाढलं आहे. मात्र पूर्वीपासून राहिलेल्या बाहेरच्या लोकांवर आक्षेप नाही, असेही राज ठाकरे म्हणाले.

आज सत्ताधारी ताट वाट्या घेऊन फिरत आहात. एक जण म्हणतो 10 रुपयात थाळी, दुसरा म्हणतो पाच रुपयात थाळी. यांची युती आहे तरी यांना अजून एक किंमत ठरवता येत नाही. महाराष्ट्र भिकेला लावण्याची थेरं सुरु आहेत असं म्हणत थाळी योजनेबाबतही राज ठाकरेंनी टीका केली.

प्रशासनाने चांगले काम केल्यास मी अभिनंदनही करेन. मी कोत्या मनाचा नाही. केंद्र सरकारच्या कारभारवर टीका केली, तरी कलम 370 रद्द केल्यावर शुभेच्छाही दिल्या. असे वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यातील सभेमध्ये केलं.  लोक ट्रेनमधून पडतात, मरतात पण तुम्हाला त्याचे काहीच नाही. राज्यात इतक्या गोष्टी घडूनही आपला महाराष्ट्र थंड, लोण्याचा गोळ्यासारखा. आम्हाला राग यायचाच बंद झाला आहे. आम्हाला कोणाचीही किंमत नाही. लोक मरतायत मरू द्या. तुमच्यात आरे ला कारे करण्याची धमक नाही. तुमच्यामध्ये ती आगच नाही. अशा शब्दांमध्ये राज ठाकरे यांनी आपला संताप व्यक्त केला.