मुंबई : मुंबईतील लोकल अपघातात हात गमावल्यानंतर भाजपची 'पोस्टर गर्ल' झालेली मोनिका मोरे मनसेच्या व्यासपीठावर आली. स्वच्छ भारत अभियानाची ब्रँड अॅम्बेसेडर राहिलेल्या मोनिकाने भाजपने आपल्याला दिलेलं नोकरीचं आश्वासन हवेतच विरल्याची खंत बोलून दाखवली. 'एबीपी माझा'शी मोनिकाने एक्स्क्लुझिव्ह बातचित केली.

पाच वर्षांपूर्वी झालेल्या लोकलच्या अपघातात मोनिका मोरेने दोन्ही हात गमावले होते. त्यानंतर भाजप खासदार किरीट सोमय्यांच्या पुढाकाराने  तिला कृत्रिम हात बसवण्यात आले. मोनिका मोरे स्वच्छ भारत अभियानाची ब्रँड अॅम्बेसेडर झाली. खु्द्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोनिकाच्या नावाचं ट्वीट करत तिचं कौतुक केलं होतं. मात्र पदवी मिळाल्यानंतर आपल्याला नोकरी-घर देण्याचं आश्वासन देऊनही सत्ताधाऱ्यांनी ते पूर्ण केला नसल्याचा दावा मोनिकाने केला आहे.

काही महिन्यांपूर्वी मोनिकाच्या डोक्यावरील पितृछत्र हरपलं. त्यानंतर हाता-तोंडाची गाठ घालण्यात आपल्याला अडचणी येत आहेत. घराचा कारभार आपल्यालाच चालवावा लागत आहे, असं मोनिका सांगते. भाजपच्या पोस्टरवर झळकलेली मोनिका नोकरी नसल्यामुळे हतबल झाली आहे. मोनिकाला मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आपल्या मंचावर बोलावून तिच्या प्रश्नांना वाचा फोडली.

VIDEO | मोदींच्या गावातचं पुरेशी शौचालय नाही, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं भाषण | मुंबई 



व्हिडिओ दाखवून भाजपची पोलखोल करण्याचा सपाटा राज ठाकरेंनी आजही काय ठेवला. राज ठाकरेंनी आपला मोर्चा थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गावाकडेच वळवला आहे. मोदींचं मूळ गाव असलेल्या गुजरातमधल्या वडनगरमध्ये पुरेशी शौचालयं नसल्याचा दावा राज ठाकरेंनी व्हिडिओच्या माध्यमातून केला. मुंबईतल्या भांडुपमध्ये झालेल्या सभेत राज ठाकरेंनी नरेंद्र मोदींच्या गावातल्या महिलांच्या प्रतिक्रिया दाखवल्या.

शहीद हेमंत करकरेंचा अपमान करणाऱ्या प्रज्ञा साध्वीला भाजप उमेदवारी कशी देऊ शकतं? असा सवालही यावेळी राज ठाकरेंनी उपस्थित केला. साध्वी प्रज्ञा यांच्या वक्तव्याचे अमित शाह समर्थन करतात. भाजपाला सत्तेचा माज आला आहे अशा शब्दात राज ठाकरेंनी भाजपाचा समाचार घेतला.

राज ठाकरे यांनी काल 'मोदी है तो मुमकीन है' या जाहिरातीची पोलखोल केली होती. त्यावेळी बोलावलेल्या चिले कुटुंबाला आज पुन्हा स्टेजवर बोलावण्यात आलं. गरीबीशी जोडण्यात आलेलं हे कुटुंब प्रत्यक्षात सधन आहे. मोदींनी जितक्या योजना सांगितल्या त्याच्या जाहिरातींवर 4500 ते 5500 कोटी रुपये खर्च केल्याचा दावा राज ठाकरेंनी केला.