मुंबई : अरविंद केजरीवाल आणि राज ठाकरे... एकाच वाक्यात ही दोन्ही नावं घ्यावीत अशी स्थिती कधीच नव्हती. अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत एकदा नव्हे तर दोनदा सत्ता आणून दाखवली, तर राज ठाकरेंना आहेत ते आमदार आणि नगरसेवक सुद्धा सांभाळता आले नाहीत हा मुख्य फरक. मात्र या दोघांचं नाव एकत्र घेण्याची वेळ आता आली आहे. याला कारण ठरलंय या दोघांचं सध्याचं राजकारण.


कधीकाळी काँग्रेसला कट्टर विरोध करणारे हे दोन नेते आता काँग्रेसने आपल्याला सोबत घ्यावं यासाठी याचना करताना सारा देश पाहत आहे. येत्या निवडणुकीत मोदींना हरवायचं असेल तर एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही, हे सर्व पक्षांच्या लक्षात आलंय. त्यामुळेच विरोधीपक्षांच्या जमेल तिथे, जमेल तशा आघाडी आणि युती होत आहेत.

काँग्रेससारखा शे-सव्वाशे वर्ष जुना पक्ष सर्व मानापमान बाजूला ठेवत प्रसंगी कमीपणा पत्करत प्रादेशिक पक्षांना सोबत घेत आहे. याला अपवाद आहेत महाराष्ट्र आणि दिल्ली ही दोन राज्यं. महाराष्ट्रात मनसेला आणि दिल्लीत आम आदमी पक्षाला सोबत घेताना काँग्रेस अजूनही कचरताना दिसत आहे.

मुंबईत झालेल्या सभेत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी 'हे महागठबंधन आहे, आमच्यासोबत येण्याची ज्यांची इच्छा असेल, त्यांच्यासाठी काँग्रेसचे दरवाजे खुले आहेत' असं सांगितलं होतं.

दिल्ली विधानसभेत 'आप'कडे 70 पैकी 67 जागा आहेत तर लोकसभेच्या सातही जागा भाजपकडे आहेत. 2014 सालची मोदीलाट हे कारण होतंच, पण काँग्रेस आणि आप यांच्यातल्या मतविभाजनाचाही भाजपला फायदा झाला होता. याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आप आणि काँग्रेसने लोकसभा एकत्र लढवावी असा इतर पक्षांचा आग्रह होता.

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सुद्धा काँग्रेसचा पिच्छा पुरवला. मात्र काँग्रेसने केजरीवालांचा हात साफ झिडकारुन टाकला. आता केजरीवाल काँग्रेसवर तोंडसुख घेत आहेत.

इकडे महाराष्ट्रात, त्यातही मुंबईत काँग्रेस आणि राष्ट्रवादी विरोधाचं बाळकडू राज ठाकरेंना अगदी सुरुवातीपासूनच मिळालं. त्याला शिवसेना विरोधाची वैयक्तिक किनार आहेच. मात्र राज ठाकरेंचं मोदीप्रेम इतक्या लवकर आटेल, अवघ्या पाच वर्षात राज ठाकरे थेट राष्ट्रवादीच्या गोटात दिसतील याची कुणीही कल्पना केली नव्हती.

राज ठाकरे मनसेचा खासदार निवडून आणू शकत नसले तरी भाजप-सेनेचे काही खासदार पाडण्यात हातभार लावू शकतात, असा विरोधी पक्षांचा अंदाज आहे. त्यामुळे राज यांना सोबत घेण्यास राष्ट्रवादीने पुढाकार घेतला, मात्र महाआघाडीत त्यांना सामील करुन घेण्यास काँग्रेस फारशी उत्सुक दिसली नाही.

खरं तर काँग्रेसविरोधावरच जन्मलेल्या 'आप'सारख्या पक्षाने काँग्रेसची एवढी मनधरणी करणं आणि राज ठाकरेंसारख्या नेत्याने काँग्रेसच्या हाताकडे याचकासारखं पाहात बसणं हा मोठा चमत्कारच. पण म्हणतात ना भारताच्या राजकारणात अशा चमत्कारांची कमतरता नाही.

मोदी विरोध या दोन नेत्यांना काँग्रेसच्या जवळ घेऊन आलाय. त्याचा फायदा होईल की तोटा ते कळेलच. पण यानिमित्ताने राजकारण बदलण्याची भाषा करणाऱ्या, नवनिर्माणाचं स्वप्न दाखवणाऱ्या दोन नेत्यांचं वर्तुळ पाचच वर्षात पूर्ण होताना दिसतंय, यापेक्षा मोठा चमत्कार तो कोणता?

राष्ट्रवादीकडून मनसेचं 'कल्याण'? | स्पेशल रिपोर्ट | एबीपी माझा