यवतमाळ : काँग्रेस आणि आधीचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कारकिर्दीमुळे भाजप-शिवसेनेची सत्ता यायला मदत झाली असा आरोप राज ठाकरेंनी केला. यवतमाळच्या वणीमध्ये मनसे उमेदवार राजू उंबरकर यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत ते बोलत होते. यवतमाळची ओळख महाराष्ट्रातील सगळ्यात जास्त शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा अशी झाली आहे,  असंही राज म्हणाले.  काँग्रेसवर टीका करताना भाजपा-शिवसेनेच्या यशाला काँग्रेस जबाबदार असल्याचं सांगत याशिवाय मंदी आणि सरकारच्या वचननाम्यावरुन राज ठाकरेंनी टीका केली.


राज ठाकरे म्हणाले की, राज्याचा विरोधी पक्षनेताच शेवटी सत्ताधारी पक्षात गेला, आता हा पक्षांतराचा निर्णय त्या नेत्याने एका दिवसात घेतलेला नसेल. म्हणजे पाच वर्षात त्या विरोधी पक्षनेत्याने कोणता कणखर विरोध सरकारला केला असेल?, असा सवाल त्यांनी केला.  गेली पाच वर्ष आणि त्याआधी सत्तेत येताना भाजपा-शिवसेना युती तसंच काँग्रेस-राष्ट्रवादीच्या हातून महाराष्ट्र का गेला? हे समजून घ्यायची गरज आहे, असंही राज ठाकरे म्हणाले. सध्या महाराष्ट्राला एका सक्षम विरोधी पक्षाची गरज आहे. अन्यथा तुमचा आवाज कोण मांडणार. सगळेच सत्तेत जाऊन बसले तर तुमच्याबद्दल कोण बोलणार. तुमचा आवाज उठवण्यासाठी मला विरोध पक्षाच्या भूमिकेतून जायचं आहे, असंही पुन्हा राज ठाकरे म्हणाले.

यवतमाळची सर्वाधिक आत्महत्या झालेला जिल्हा ही ओळख कशी काय होऊ शकते? असा सवाल त्यांनी केला. गेल्या पाच वर्षात महाराष्ट्रात 14 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत, मात्र सत्ताधाऱ्यांना त्याचं काही वाटत नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.  माझी माणसं आत पाठवलीत तर तुमचा आवाज आत जाईल. सध्या राज्यात आणि केंद्रात विरोध पक्षाची भूमिकाच महत्त्वाची आहे, असं राज ठाकरेंनी म्हटलं. निवडणुकीकडे गंमत, खेळ मजा म्हणून पाहिलंत तर विषय कधीच संपणार नाही. निवडणुकीच्या वेळी पैसे फेकले तरी ही माणसं सगळं विसरुन जातात असं यांना वाटत, अशी टीकाही त्यांनी केली.

रविशंकर प्रसाद यांच्या चित्रपटांनी कोटींचा धंदा केला आहे या वक्तव्यावर देखील सडकून टीका केली.  चित्रपट चालले म्हणजे मंदी नाही. देशातील अनेक उद्योग बंद होत आहेत त्याला मंदी नाही म्हणायचं का?, असा सवाल त्यांनी केला.