Raigad Lok Sabha Election Result 2024: रायगड : लोकसभा निवडणुकांचा निकाल (Lok Sabha Election Result 2024) अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. अशातच देशभरात मतमोजणीसाठी (Lok Sabha Election Counting) निवडणूक यंत्रणाही सज्ज झाल्या आहेत. रायगडमध्येही (Raigad News) निवडणूक निकालासाठी यंत्रणा सज्ज झाली असून तब्बल एक हजारांहून अधिक अधिकारी, कर्मचारी तैनात असणार आहेत. अलिबागमधील (Alibag) नेहूली येथील क्रीडा संकुलात मतमोजणी होणार आहे. लोकसभा मतदारसंघात (Lok Sabha Constituency) समाविष्ठ होणाऱ्या सहाही विधानसभा मतदारसंघांसाठी (Assembly Constituency) स्वतंत्रपणे मतमोजणी टेबल आणि फेऱ्यांची रचना करण्यात आली आहे. 


अजित पवार गटाकडून विद्यमान खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी अनंत गीते (Anant Geete) यांना शिवसेना ठाकरे गटाकडून रिंगणात उतरवण्यात आलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा रायगड लोकसभेला सुनील तटकरे विरुद्ध अनंत गीते असा सामना रंगणार आहे.


रायगड लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी उद्या (मंगळवार, 4 जून 2024) सकाळी 8 वाजल्यापासून अलिबाग, नेहूली येथील क्रीडा संकुलात मतमोजणीला सुरुवात होणार आहे. रायगड लोकसभा निवडणुकीची मतमोजणी पार पाडण्यासाठी आवश्यक तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, मतमोजणी प्रक्रिया पार पाडण्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिली आहे. 


अलिबाग येथील नेहूली क्रीडा संकुलात केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार, ही मतमोजणी पार पडणार आहे. या संपूर्ण परिसरात सुरक्षा कक्ष (स्ट्राँग रूम) तयार करून निवडणुकीच्या मतमोजणीसाठी वापरलेली ईव्हीएम यंत्रं आणि टपाली मतपेट्या ठेवण्यात आल्या आहेत. याठिकाणी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. मतमोजणीच्या दिवशी या सुरक्षा कक्षांचं सील निवडणूक निरीक्षक, निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तसेच, रायगड लोकसभा निवडणुकीतील उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत उघडण्यात येऊन सकाळी 8 वाजल्यापासून प्रत्यक्ष मतमोजणीला सुरूवात होणार आहे.


2024 लोकसभा निवडणुकीतील मतदानाची टक्केवारी


रायगड लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणूकीसाठी 7 मे 2024 रोजी एकूण 2 हजार 185 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीमध्ये एकूण 60.51 टक्के एवढे मतदान झालं आहे. 



  • पेण : 64.51 टक्के

  • अलिबाग : 66.67 टक्के

  •  श्रीवर्धन : 59.20 टक्के

  • महाड : 57.56 टक्के

  • दापोली 57.37 टक्के

  • गुहागर 56.44 टक्के


रायगड लोकसभा मतमोजणीसाठी टेबल आणि फेऱ्यांची रचना कशी असेल?  


रायगड लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघनिहाय स्वतंत्रपणे लावण्यात येणार आहेत.



  • पेण विधानसभा मतदारसंघासाठी 14  टेबल लावण्यात येणार असून मतमोजणीसाठी 27 फेऱ्या होणार आहेत. 

  • अलिबाग विधानसभा मतदारसंघासाठी 14 मतमोजणी टेबल लावण्यात येणार असून मतमोजणीच्या 27 फेऱ्या होतील.

  • श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघासाठी 14 मतमोजणी टेबल लावण्यात येणार असून मतमोजणीसाठी 26 फेऱ्या होणार आहेत. 

  • महाड विधानसभा मतदारसंघासाठी 14 टेबल लावण्यात येणार असून 29 मतमोजणी फेऱ्या होणार आहेत.

  • दापोली विधानसभा मतदारसंघासाठी 14 मतमोजणी टेबल लावण्यात येणार असून 27 मतमोजणी फेऱ्या होणार आहेत.

  • गुहागर विधानसभा मतदारसंघासाठी 14 मतमोजणी टेबल लावण्यात येणार असून 23 मतमोजणी फेऱ्या होणार आहेत.

  • पोस्ट मतांच्या मोजणीसाठी स्वतंत्र  मतमोजणी टेबल लावण्यात आलेले आहेत. 


मतमोजणीसाठी मनुष्यबळाची नियुक्ती


मतमोजणीसाठी एकूण 1  हजार अधिकारी, कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, इतर अधिकारी, सुक्ष्म निरीक्षक, मतमोजणी पर्यवेक्षक, मतमोजणी सहाय्यक, तालिका कर्मचारी, शिपाई, हमाल, इतर कर्मचारी वर्ग नेमण्यात आला आहे.