नवी दिल्ली : काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) केरळमधील वायनाड (Wayanad) लोकसभा मतदारसंघातील खासदारकीचा राजीनामा देणार आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांनी पत्रकार परिषदेत ही मोठी घोषणा केली आहे. राहुल गांधी हे रायबरेलीची खासदारकी कायम ठेवणार असून वायनाडच्या खासदारकीचा राजीनामा देणार आहेत. राहुल गांधी यांनी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत वायनाड आणि रायबरेली मतदारसंघातून विजय मिळवला आहे. आता राहुल गांधी प्रियंका गांधी यांच्यासाठी वायनाडची जागा सोडणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.


राहुल गांधी खासदारकीचा देणार राजीनामा


यंदाच्या लोकसभा निवडणुकीत वायनाड आणि रायबरेली मतदारसंघातून विजय मिळवल्याने राहुल गांधी दोन मतदारसंघातून खासदार आहेत. पण, त्यांना दोन पैकी एक खासदारकी कायम ठेवून दुसऱ्या खासदारकीचा राजीनामा द्यावा लागणार आहे. त्यामुळे राहुल गांधी यांनी रायबरेलीची खासदारकी कायम ठेवत वायनाडच्या खासदारकीचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे.


वायनाडमधून प्रियंका गांधी पोटनिवडणुकीच्या रिंगणात


यासोबतच काँग्रेसने आणखी एक मोठी घोषणा करत वायनाडच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारही जाहीर केला आहे. काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी वायनाड पोटनिवडणूक लढवणार आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी प्रियंका गांधी यांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे. महत्त्वाचं म्हणजे प्रियंका गांधी यांची ही पहिली निवडणूक असणार आहे.


निर्णय घेण्यासाठी 14 दिवसांचा कालवधी


लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर 14 दिवसांत निर्णय घ्यायचा होता. नियमानुसार, 4 जून रोजी जाहीर झालेल्या लोकसभा निकालानंतर 14 दिवसांच्या आत राहुल गांधी यांना एक खासदारकी सोडायची होती. आता राहुल गांधी यांनी रायबरेलीत राहण्याचा निर्णय घेतल्याने त्यांची बहीण प्रियंका गांधी वायनाडच्या रिक्त जागेवरून पोटनिवडणूक लढवणार आहेत.


मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा


काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी नवी दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यासोबत पत्रकार परिषदेत घोषणा केली. यावेळी त्यांनी सांगितलं की, "राहुल गांधी लोकसभेच्या दोन जागांवरून विजयी झाले, पण कायद्यानुसार त्यांना एक जागा सोडावी लागेल. राहुल गांधी रायबरेलीतील खासदारकी ठेवतील. आम्ही ठरवले आहे की, प्रियंका गांधी वायनाडमधून निवडणूक लढवतील" या निर्णयानंतर राहुल गांधी म्हणाले की, रायबरेली आणि वायनाड या दोन्ही ठिकाणी दोन खासदार मिळतील. मी वायनाडच्या लोकांना राहुलची अनुपस्थिती जाणवू देणार नाही, असे प्रियांका गांधी यांनी म्हटलं आहे.