मुंबई: राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले. या पत्रकार परिषदेत एक तिजोरी आणण्यात आली होती. या तिजोरीवर 'एक है तो सेफ है', (Ek hai to Safe Hai) असा स्टिकर लावण्यात आला होता. या तिजोरीच्या आतमध्ये उद्योगपती गौतम अदानी (Adani) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांचा फोटो लावण्यात आला होता. या माध्यमातून राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी अदानी आणि पंतप्रधान मोदी यांच्यात साटेलोटे असल्याचा मुद्दा अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला. 


मुंबईतील धारावी प्रकल्पाचा 1 लाख कोटींचा व्यवहार पंतप्रधान मोदी आणि गौतम अदानी यांचे प्रमुख लक्ष्य आहे. महाराष्ट्राची निवडणूक ⁠अरबपत्ती आणि सर्वसामान्य लोकांची ही निवडणूक आहे. रोजगार महागाई हा सर्वात मोठा विषय आहे. मोदीजी, अदानीजी आणि अमित शाह एकत्र आहेत. कोण सेफ असेल तर ते अदानीजी आहेत. धारावी हे भारतातील लघू-मध्यम उद्योगाचे एक प्रमुख केंद्र आहे. हे केंद्र एका व्यक्तीसाठी संपवले जात आहे. एका व्यक्तीच्या फायद्यासाठी संपूर्ण यंत्रणा कामाला लागली आहे, याला आमचा आक्षेप आहे. 'एक है तो सेफ है' या घोषणेचा हा खरा अर्थ आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले.


धारावीत एका व्यक्तीच्या फायद्यासाठी सर्वकाही सुरु आहे. याच व्यक्तीला एअरपोर्ट, डिफेन्स क्षेत्रातील कंत्राटं दिली जात आहेत. पंतप्रधान आणि या व्यक्तीचं जुनं नातं आहे. महाराष्ट्रातील अनेक उद्योग हे गुजरातला गेले आहेत. धारावीची जमीन हिसकावली जात आहे. ⁠7 लाख करोड रुपयांचे उद्योग राज्यातून गेले. राज्यातील 5 लाख तरुणांना याचा फायदा झाला असता, असा आरोप राहुल गांधी यांनी केला. या पत्रकार परिषदेला राहुल गांधी यांच्यासोबत के सी वेणुगोपाल, रमेश चेनिथल्ला, अशोक गेहलोत, अविनाश पांडे, वर्षा गायकवाड, नसीम खान, पवन खेरा उपस्थित होते.


राहुल गांधी यांच्या टीकेला भाजप काय प्रत्युत्तर देणार, हे पाहावे लागेल. राहुल गांधी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या संपूर्ण प्रचारात धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा मुद्दा लावून धरला आहे. या माध्यमातून राहुल गांधी हे पंतप्रधान मोदी आणि अदानींना सातत्याने लक्ष करत आहेत.  आता राहुल गांधींचा हा प्रचार मतदारांना किती भावणार, हे 23 नोव्हेंबरलाच स्पष्ट होईल.



आणखी वाचा


Video : राहुल गांधी तुम्हाला *त्या बनवत आहेत; प्रकाश आंबेडकरांचा पहिल्याच सभेतून राहुल गांधींवर हल्लाबोल