नवी दिल्ली : काँग्रेसला घराणेशाहीच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी अध्यक्ष राहुल गांधी धाडसी आणि ऐतिहासिक निर्णयाच्या पवित्र्यात आहेत. मुलांच्या उमेदवारीसाठी दबाव टाकणाऱ्या ज्येष्ठ नेत्यांवरच राहुल गांधी बरसले. अशोक गहलोत, कमलनाथ आणि पी चिदंबरम यांच्याकडे राहुल गांधींचा रोख होता. विशेष म्हणजे घराणेशाहीमुक्त काँग्रेसची सुरुवात स्वतःपासून करण्यासाठी त्यांनी काँग्रेसचं अध्यक्षपद गांधी घराण्याबाहेरच्या नेत्याकडे सोपवण्याचा चंग बांधला आहे.

देशावर 60 वर्षांहून अधिक काळ सत्ता गाजवणाऱ्या काँग्रेस पक्षाला, आता विरोधी पक्षनेते पदाच्या बाकावर बसता येईल एवढ्याही जागा मिळवता आलेल्या नाहीत. काँग्रेसच्या या वाताहतीला राहुल गांधींनी पुत्रप्रेमात आंधळे झालेल्या पक्षातल्या ज्येष्ठ नेत्यांना जबाबदार धरलं आहे.

'मुलाला उमेदवारी देण्यासाठी काही नेत्यांनी दबाव आणला, त्यासाठी त्यांनी राजीनाम्याची भाषा केली' अशा शब्दात राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत नाराजीचा सूर आळवला. राहुल गांधींचा रोख राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ, आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्याकडे होता. राजीनाम्याची भाषा केल्याने या त्रिमूर्तीच्या दबावापोटी राहुल गांधींनी त्यांच्या लेकरांना उमेदवारी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.



काँग्रेसला तारण्यासाठी पक्षाला घराणेशाहीच्या साखळदंडातून मुक्त करणं गरजेचं असल्याचं राहुल गांधींना उमगलं आहे. त्याची सुरुवात राहुल गांधींनी स्वतःपासून करण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसचा पुढचा अध्यक्ष गांधी घराण्याचा नको, एवढंच काय तर प्रियंका गांधींच्याही नावाचा त्यासाठी विचार करु नका, या प्रस्तावावर राहुल गांधी ठाम आहेत.

लोकसभेच्या प्रचारादरम्यान मोदी आणि शाहांनी काँग्रेसच्या घराणेशाहीवर बोट ठेवताना, अगदी नेहरु आणि राजीव गांधींवरही देखील हल्लाबोल केला होता. सत्ताधाऱ्यांच्या टीकेनंतर आणि पक्षाच्या वाट्याला आलेल्या मोठ्या पराभवातून राहुल आणि प्रियांका गांधींनी काँग्रेसमध्ये संघटनात्मक बदल करण्याच्या सूचना दिल्या आहेत

काँग्रेसमधली घराणेशाही संपुष्टात आली तर पक्षाला नवसंजीवनी देणारे चेहरे मिळू शकतील. तसंच मतदारांचा, विशेषतः तरुण वर्गाचा पक्षाकडे बघण्याचा दृष्टीकोनही बदलेल, अशी आशा राहुल गांधींना वाटते.