मुंबई : पृथ्वी शॉच्या नॉर्थ मुंबई पँथर्स संघानं सोबो सुपरसॉनिक्सचा बारा धावांनी धुव्वा उडवून यंदाच्या मुंबई टी ट्वेन्टी लीगचं विजेतेपद पटकावलं. या सामन्यात नॉर्थ मुंबई पॅन्थर्सनं सुपरसॉनिक्ससमोर 144 धावांचं आव्हान ठेवलं होतं.
पण आतिफ अत्तरवाला, प्रथमेश डाके आणि प्रविण तांबेच्या भेदक माऱ्यासमोर सुपरसॉनिक्सचा डाव 131 धावांत आटोपला. आतिफ आणि प्रथमेशनं प्रत्येकी तीन फलंदाजांना माघारी धाडलं. तर अनुभवी प्रविण तांबेनं दोन विकेट्स घेतल्या.
त्याआधी कर्णधार पृथ्वी शॉच्या नाबाद अर्धशतकी खेळीमुळे नॉर्थ मुंबई पॅन्थर्सनं सात बाद 143 धावांची मजल मारली होती. पृथ्वीनं 55 चेंडूत तीन चौकार आणि दोन षटकारांसह नाबाद 61 धावांची निर्णायक खेळी उभारली.