नवी दिल्ली : लोकसभेसाठी सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील निवडणुका पार पडल्यानंतर काँग्रेस आक्रमक झाली आहे. थेट निवडणूक आयोगावर शरसंधान साधत ट्वीटरवरुन राहुल गांधी यांनी जोरदार टीका केली आहे. विविध उदाहरणांचा दाखला देत राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर पक्षपातीपणाचा आरोप केला आहे.

“ईलेक्टरोल बॉण्ड्स आणि ईव्हीएमपासून निवडणुकीच्या वेळापत्रकात छेडछाडीपर्यंत, नमो टीव्ही, ‘मोदीज आर्मी’ आणि आता केदारनाथच्या नाटकापर्यंत निवडणूक आयोग मिस्टर मोदी आणि त्यांच्या गँगसमोर झुकल्याचं जगजाहीर आहे,” म्हणत त्यांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर बोट ठेवलं आहे. तसंच “निवडणूक आयोगाची आतापर्यंत भीती वाटायची आणि आदरही वाटायचा. आता तो राहिला नाही” अशा शब्दात निवडणूक आयोगावर राहुल गांधींनी निशाणा साधला आहे. मोदी आणि त्यांच्या गँगसमोर निवडणूक आयोगानं शरणागती पत्करली आहे, अशा आशयाचं ट्विटच राहुल गांधी यांनी केलं आहे.


याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केदारनाथ आणि बद्रीनाथ वारीवर तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तीव्र आक्षेप घेतला होता. हा आचारसंहितेचा भंग असल्याचं म्हणत निवडणूक आयोगाकडे त्याची तक्रारही करण्यात आली होती. आता राहुल गांधीही मोदींविरोधात पुन्हा मैदानात उतरले आहेत. त्यांनी ट्विट करुन निवडणूक आयोगावर आक्षेप घेतला आहे.



पंतप्रधान मोदींनी मतदारांना प्रभावित करण्यासाठी तीर्थयात्रा केली, असं म्हणत पी चिदंबरम यांनीही मोदींवर निशाणा साधला आहे.