नवी दिल्ली : अमेठीमधून स्मृती इराणी जिंकल्या आहेत. मी त्यांचे अभिनंदन करतो. अमेठीच्या जनतेने हा निर्णय घेतला आहे. ही लोकशाही आहे, त्यामुळे या निर्णयाचे स्वागत करतो. स्मृती इराणी यांनी प्रेमाने अमेठीच्या जनतेची काळजी घ्यावी. त्यांनी जो तुमच्यावर विश्वास ठेवला आहे तो विश्वास कायम ठेवा, असे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
देशात झालेल्या काँग्रेसच्या पराभवानंतर राहुल गांधी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना घाबरू नका, असे आवाहन देखील केले.
यावेळी राहुल गांधी म्हणाले की, जनता मालक आहे. जनतेने स्पष्टपणे त्यांचा निर्णय दिला आहे. भाजप आणि एनडीएच्या विजयाबाबत नरेंद्र मोदी आणि भाजपचं अभिनंदन करतो. तसेच आमच्या काँग्रेस पक्षाचे उमेदवार आणि कार्यकर्त्यांचे देखील अभिनंदन करतो, असे ते म्हणाले.
दोन वेगवेगळ्या विचारधारा आहेत. एकीकडे नरेंद्र मोदी आणि भाजपची विचारधारा आहे आणि दुसरीकडे काँग्रेसची विचारधारा आहे. मात्र तरीही हा जनतेचा कौल आहे. या विजयाबद्दल मोदी आणि भाजपचं अभिनंदन करतो. जर भारतीय जनतेला नरेंद्र मोदी हे पंतप्रधान म्हणून हवे असतील तर मी त्यांच्या मताचा आदर करतो, असे राहुल म्हणाले.
प्रेम कधीच पराभूत होतं नसतं
काँग्रेस कार्यकर्त्यांनी घाबरण्याचे काही गरज नाही. आत्मविश्वास गमावू नका. या देशात खूप सारे लोक काँग्रेसची विचारधारा मानतात. आपण पुन्हा निवडून येऊ, असे ते म्हणाले.
हे खूप मोठे कॅम्पेन होते. त्यात आम्ही एक लाईन ठेवली होती. माझ्या विरोधात कुणी वाईट बोललं, शिव्या दिल्या मी फक्त प्रेमानेच बोलणार. ही माझी फिलॉसॉफी आहे. प्रेम कधीच पराभूत होतं नसतं, असेही ते म्हणाले.
काँग्रेसने तिसऱ्यांदा गमावली अमेठीची हक्काची जागा
काँग्रेसने आजवर तिसऱ्यांदा लोकसभेमध्ये आपला गड असलेली अमेठीची जागा तिसऱ्यांदा गमावली आहे. आणीबाणीनंतर १९७७ साली राहुल गांधी यांचे काका संजय गांधी यांचा अमेठीतून पराभव झाला होता तर 1998 साली काँग्रेसचे सतीश शर्मा यांचा पराभव झाला होता. आणि यावेळी राहुल गांधी यांना अमेठीतून पराभवाचा सामना करावा लागला आहे.
अमेठीत जरी राहुल गांधी यांचा पराभव झाला असला तरी वायनाडमध्ये त्यांनी विक्रमी आघाडी घेत मोठ्या विजयाकडे वाटचाल केली आहे.
स्मृती इराणींचं अभिनंदन, अमेठीची प्रेमाने काळजी घ्या : राहुल गांधी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
23 May 2019 06:31 PM (IST)
देशात झालेल्या काँग्रेसच्या पराभवानंतर राहुल गांधी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना घाबरू नका, असे आवाहन देखील केले.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -