मुंबई : लोकसभा निवडणुकीचे निकाल हाती येऊ लागले आहेत. आतापर्यंत हाती आलेल्या निकालांनुसार देशात भाजपप्रणित एनडीएला 346 जागांवर आघाडी मिळाली आहे तर काँग्रेस आघाडीला 91 जागांवर आघाडी मिळाली आहे. 105 जागांवर सपा, बसपासह देशातील इतर पक्ष आणि अपक्ष उमेदवारांना आघाडी मिळाली आहे. महाराष्ट्रातील 48 जागांचा विचार केला तर भाजप 23, शिवसेना 18, राष्ट्रवादी 5, काँग्रेस 1 आणि वंचित आघाडीने एका जागेवर आघाडी मिळवली आहे. आजच्या निकालात महाराष्ट्रातील अनेक दिग्गजांना मोठे धक्के बसले आहेत.
महाराष्ट्रातील अनेक दिग्गज नेते सध्या पराभवाच्या छायेत आहेत. केंद्रीय मंत्री अनंत गीते यांचा राष्ट्रवादीच्या सुनील तटकरे यांनी पराभव केला आहे. महाराष्ट्राचे दोन मुख्यमंत्री सध्या मोठ्या फरकाने पिछाडीवर आहेत. माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे हे सध्या सोलापूर मतदार संघातून पिछाडीवर आहेत. या मतदारसंघात भाजपच्या जयसिद्धेश्वर स्वामींना मोठी लीड मिळाली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकरांनी शिंदेंची मतं फोडल्यामुळे ते पिछाडीवर असल्याचे बोलले जात आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचादेखील पराभव झाला आहे. भाजपच्या प्रताप पाटील-चिखलीकर यांनी अशोक चव्हणांचा तब्बल 50 हजार मतांच्या फरकाने पराभव केला आहे. या मतदारसरंघातही वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसचे नुकसान केले असल्याची चर्चा राजकीय वर्तूळात सुरु आहे.
केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर हेदेखील सध्या पिछाडीवर आहेत. काँग्रेसचे बाळू धानोरकर आघाडीवर असले तरी त्या दोघांमध्ये जास्त मतांचा फरक नाही. त्यामुळेच येथील निकालाचा अंदाज वर्तवणे अवघड आहे. मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपमदेखील पिछाडीवर आहेत. शिवसेनेच्या गजानन कीर्तिकर यांना निरुपम यांच्याविरोधात मोठी आघाडी मिळाली आहे. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरादेखील सध्या पिछाडीवर आहेत. शिवसेनेच्या अरविंद सावंतांनी निरुपम यांना मोठा धक्का दिला आहे.
औरंगाबादमध्ये शिवसेनेला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. औरंगाबाद हा शिवसेनेचा गड मानला जातो. शिवसेनेचे चंद्रकांत खैरे हे गेल्या 20 वर्षांपासून औरंगाबादचे खासदार आहेत. परंतु एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील हे सध्या औरंगाबादमध्ये आघाडीवर आहेत.
संबधित बातम्या :
राज ठाकरे यांनी सभा घेतलेल्या सर्व मतदारसंघांमध्ये आघाडीचे उमेदवार पिछाडीवर
मुंबईतल्या सर्व जागा शिवसेना-भाजपने राखल्या?
महाराष्ट्रात 'या' दिग्गजांना पराभवाचा धक्का
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
23 May 2019 03:47 PM (IST)
लोकसभा निवडणुकीचे निकाल हाती येऊ लागले आहेत. आतापर्यंत हाती आलेल्या निकालांनुसार देशात भाजपप्रणित एनडीएला 346 जागांवर आघाडी मिळाली आहे तर काँग्रेस आघाडीला 91 जागांवर आघाडी मिळाली आहे. 105 जागांवर सपा, बसपासह देशातील इतर पक्ष आणि अपक्ष उमेदवारांना आघाडी मिळाली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -