मुंबई : लोकसभा निवडणुकीचे सर्व जागांवरील कल हाती आले आहेत. या निकालात भाजपसह मित्र पक्षांनी मोठी मुसंडी मारली आहे. मागील 2014 च्या लोकसभा निवडणुकीपेक्षा यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपला अधिक जागा मिळतील असं एकूण चित्र आहे. भाजप जवळपास 350 जागांवर आघाडीवर आहे. भाजप आणि मित्रपक्षांची ही आघाडी शेवटपर्यंत टिकली तर सलग दुसऱ्या टर्ममध्ये आधीपेक्षा अधिक जागा मिळवणारा भाजप पक्ष आणि नरेंद्र मोदी पहिले पंतप्रधान ठरणार आहेत.


2014 लोकसभा निवडणुकीत भाजपने 282 जागांवर विजय मिळवला होता. तर यंदा भाजप 299 जागांवर आघाडीवर आहे. 2014 लोकसभा निवडणुकीत भाजपसह मित्रपक्षांनी 336 जागांवर विजय मिळवला होता. तर यंदा भाजपसह मित्रपक्ष 344 जागावर आघाडीवर आहेत.


विरोधकांचा आक्रमक पवित्रा फेल


निवडणुकीच्या आधी काँग्रेस आणि विरोधीपक्षांनी भाजप विरोधात मोठी मोहीम उघडली होती. यामध्ये नोटाबंदी, राफेल घोटाळा, शेतकऱ्यांचे प्रश्न, जीएसटी, बेरोजगारी अशा विविध मुद्द्यांवर विरोधकांनी मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. मात्र विरोधकांचा हा प्रयत्न फेल झाल्याचं स्पष्ट झालं आहे.


काँग्रेसने याआधी 1967-70 मध्ये इंदिरा गांधींच्या नेतृत्वात 520 पैकी 283 जागा जिंकून सत्ता स्थापन केली होती. त्यानंतरच्या 1971 च्या निवडणुकीत 520 पैकी 352 जागा काँग्रेसला मिळाल्या, मात्र त्यावेळी त्यांचा पक्ष वेगळा होता. प्रस्थापित काँग्रेस नेत्यांच्या विरोधात काँग्रेस इंडिकेट हा गट स्थापन करुन त्यांनी निवडणूक लढवली होती. प्रस्थापित काँग्रेसला त्यावेळी सिंडिकेट काँग्रेस म्हणायचे. याच 1971-77 टर्ममध्ये इंदिरा गांधींनी देशात दीड वर्ष आणीबाणी लागू केली.


आणीबाणीनंतर झालेल्या निवडणुकीत जनता पक्षाचं सरकार आलं. आता सत्तेत असलेल्या भाजपचा जुना अवतार म्हणजे जनसंघ जनता पक्षात सत्तेतील भागीदार होता. 1977 ते 79 या तीन वर्षात देशात मोरारजी देसाई आणि चौधरी चरणसिंग असे दोन पंतप्रधान झाले. त्यानंतर 1980 साली झालेल्या निवडणुकीत 353 जागा जिंकत इंदिरा गांधींनी पुनरागमन केलं. ऑक्टोबर 1984 मध्ये इंदिरा गांधी यांची हत्या झाली.


त्यानंतर 1984 साली काँग्रेसने 404 जागा जिंकत पुन्हा सत्ता स्थापन केली आणि राजीव गांधी देशाचे पंतप्रधान झाले. आजवरच्या इतिहासात लोकसभा निवडणुकीत एका पक्षाने जिंकलेल्या या सर्वाधिक जागा आहेत. मात्र इंदिरा गांधीच्या हत्येमुळे निर्माण झालेल्या सहानुभूतीचा फायदा त्यावेळी काँग्रेसला मिळाला.


2019 लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भाजपला सलग दुसऱ्या टर्ममध्ये आधीपेक्षा जास्त जागा मिळण्याची शक्यता आहे. मात्र यावेळी कोणतीही सहानुभूतीही नाही किंवा पक्ष बदल अशी परिस्थिती नाही. त्यामुळे केवळ मोदींचा करिष्मा दोन्ही निवडणुकीत पाहायला मिळाला असल्याचं दिसून येत आहे.


VIDEO | बीडमध्ये प्रीतम मुंडे विजयाच्या उंबरठ्यावर, पंकजा आणि प्रीतम मुंडेंशी चर्चा