नवी दिल्ली : निवडणुकांच्या तोंडावर भाजपमध्ये सेलिब्रेटींचं इनकमिंग सुरुच आहे. प्रसिद्ध गायक दलेर मेहंदीनेही भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. दिल्लीमध्ये दलेर मेहंदीचा पक्षप्रवेश झाला.


दलेर मेहंदीचे व्याही आणि गायक हंसराज हंस यांनी काहीच दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता. हंसराज हे दिल्लीतून लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. दलेर मेहंदी व्याह्यांचा प्रचार करणार आहे.

दलेर मेहंदीच्या कन्येचा विवाह हंसराज हंस यांच्या मुलाशी झाला आहे. व्याह्यांची साथ देणं माझा धर्म आहे, असंही यावेळी मेहंदी म्हणाला.

पक्षप्रवेश करताना दलेर मेहंदीने 'नमो-नमो' गाणं गुणगुणलं. मोदींनी पाच वर्ष न झोपता खूप काम केलं आहे, असं म्हणत 'आजा वे मोदी तेरा रस्ता उडिख दियाँ' असं गाणं मेहंदीने गायलं.

1995 मध्ये दलेर मेहंदीचा ‘बोलो तारारारा’ हा पहिला अल्बम प्रचंड लोकप्रिय झाला होता. 1998 मध्ये दलेर मेहंदीचा ‘तुनक तुनक तून’ हा अल्बमही प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला होता.

गेल्या वर्षी दलेर मेहंदीला मानव तस्करी प्रकरणी दोषी धरत दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. सध्या तो जामिनावर बाहेर आहे.

मानव तस्कर प्रकरण हे 2003 मधील होतं, मात्र तो तब्बल 15 वर्षांनी दोषी ठरला. त्याला गुन्हेगारी कट रचल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आलं होतं. दलेर मेहंदीविरोधात एकूण 31 प्रकरणात आरोप होते.

याआधी अभिनेत्री जयाप्रदा, अभिनेता सनी देओल, भोजपुरी गायक रवी किशन, निरहुआ, क्रिकेटपटू गौतम गंभीर यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे.