ठाणे : ठाण्यात महायुतीचे उमेदवार राजन विचारे यांना विरोध करणाऱ्या वाघबीळ गावात पोलिसांचा धाक असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. सरकारकडून पोलिस यंत्रणेचा गैरवापर होत असल्याचा दावा आव्हाडांनी केला आहे.


दोन दिवसांपूर्वी ठाण्यातील वाघबीळ गावातून राजन विचारे यांना विरोध करण्यात आला होता. त्या गावात आज 500 पोलिस सशस्त्र घुसले होते, असा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

VIDEO | ठाण्यात राजन विचारेंना विरोध करणाऱ्यांना पोलिसांचा धाक?, जितेंद्र आव्हाडांचा आरोप | ठाणे | एबीपी माझा



पोलिस यंत्रणेचा गैरवापर सरकारकडून केला जात आहे. राजन विचारे यांना विरोध वाढत जात आहे. नवी मुंबईतही दहा गावं मतदानावर बहिष्कार घालणार आहेत, असा दावा आव्हाडांनी केला.

ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसने पत्रकार परिषद घेऊन हा आरोप केला. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, विद्या चव्हाण, जितेंद्र आव्हाड, संजीव नाईक, महाआघाडीचे उमेदवार आनंद परांजपे उपस्थित होते.

दुसरीकडे, लोकसभा निवडणुकांच्या चौथ्या टप्प्यातील मतदानाला अवघे तीन दिवस उरले असताना ठाण्यात महायुतीमध्ये फूट पडल्याचं समोर आलं आहे. वारंवार अपमान झाल्याच्या भावनेतून रिपाइंने महायुतीचे उमेदवार राजन विचारेंचा विरोध करत महाआघाडीचे उमेदवार आनंद परांजपे यांना पाठिंबा जाहीर केला आहे.