Punjab Election Campaign : देशात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकींचा रणसंग्राम सध्या सुरू आहे. गोवा आणि उत्तराखंडमधील मतदान प्रक्रिया पार पडली आहे. तसेच उत्तर प्रदेशातील मतदानाचे दोन टप्पे पार पडले आहेत. अद्याप पंजाब, मणिपूर आणि उत्तर प्रदेशमध्ये मतदान प्रक्रिया बाकी आहे. पंजाब विधानसभेच्या 117 जागांसाठी उद्या (20 फेब्रुवारी) मतदान होणार आहे. यासाठी सुरू असलेल्या प्रचाराच्या तोफा काल रात्री थंड झाल्या. शेवटच्या दिवशी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार प्रचार केल्याचे पाहायला मिळाले.  


दरम्यान, काँग्रेसने आदल्या दिवशी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. राज्यात पुन्हा सत्तेवर आल्यास महिलांना आर्थिक मदत, एक लाख सरकारी नोकऱ्या आणि दारू विक्री आणि वाळू उत्खननासाठी महामंडळे निर्माण करण्याचे आश्वासन दिले आहे.


शेवटच्या दिवशी दिग्गजांच्या सभा 


काल प्राचाराचा शेवटचा दिवस होता. त्यानिमित्त सर्वच राजकीय पक्षांनी जोरदर प्रचार केल्याचे पाहायला मिळाले. दिग्गजांनी जाहीर सभा घेत आपल्याच पक्षाला मतदान करण्याचे आवाहन केले. मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी, आम आदमी पक्षाचे (आप) नेते अरविंद केजरीवाल, भगवंत मान आणि शिरोमणी अकाली दलाचे नेते बिक्रम सिंह मजिठिया यांनी भदौर, जलालाबाद, रायकोट आणि अमृतसर येथे रोड शो केले. माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पटियालामध्ये रोड शो केला. अमरिंदर सिंग यांच्या पत्नी आणि काँग्रेस खासदार प्रनीत कौर यांनीही या रोड शोला हजेरी लावली होती. माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल आणि शिरोमणी अकाली दल (एसएडी) अध्यक्ष सुखबीर बादल यांनीही शेवटच्या दिवशी प्रचार केला. राज्यात 93 महिलांसह एकूण 1 हजार 304 उमेदवार रिंगणात आहेत.


दरम्यान, पंजाबचे मुख्य निवडणूक अधिकारी एस करुणा राजू यांनी सांगितले की, उद्या सकाळी ८ वाजता मतदानाला सुरूवात होईल, सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतजानाचा हक्क बजावता येणार आहे. पंजाबमध्ये प्रथम मतदानाची तारीख ही 14 फेब्रुवारी होती. पण गुरु रविदास जयंती पाहता निवडणूक आयोगाने तारीख बदलत 20 फेब्रुवारी केली आहे. 


हे मोठे चेहरे निवडणुकीच्या रिंगणात 


निवडणुकीतील प्रमुख उमेदवारांमध्ये मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी, आम आदमी पक्षाचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा असलेले भगवंत मान, पंजाब काँग्रेसचे प्रमुख नवज्योत सिंह सिद्धू, माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग, प्रकाश सिंग बादल आणि शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंग बादल, शिरोमणी अकाली दलाचे नेते बिक्रम सिंह मजिठिया यांचा समावेश आहे. चन्नी हे रुपनगरमधील चमकौर साहिब आणि बर्नालामधील भदौर या दोन जागांवर निवडणूक लढवत आहेत. 


महत्त्वाच्या बातम्या: