BLOG: सन 1945 साली आझाद हिंद फौजेच्या अधिकाऱ्यांवर खटला भरण्यात आला. या खटल्यावर नंतर 18 फेब्रुवारी 1946 रोजी भडकलेल्या भारतीय नौसेनेच्या विद्रोहाचा प्रभाव पडला. आझाद हिंदच्या अधिकाऱ्यांवर सुरू असलेल्या खटल्याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं. या मागचं महत्त्वाचं कारण म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा करिष्मा आणि त्यांच्या सेनेने केलेल्या पराक्रमाच्या गोष्टीमुळे देशातील कोट्यवधी नागरिक भारावून गेले होते. 1939 साली काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवडून आलेल्या नेताजींना काही आठवड्यातच समजलं की काँग्रेस पक्षाची पूर्ण संघटना ही महात्मा गांधींच्या मागे आहे. 


ब्रिटिशांच्या डोळ्यात धूळ फेकून 1941 साली नेताजी त्यांच्या कोलकात्यातील घरातून निसटले आणि अफगानिस्तानमार्गे जर्मनीला पोहोचले. त्यांनी हिटलरची भेट घेतली. 1943 साली त्यांनी आझाद हिंद फौजेची कमान सांभाळली. त्याच वर्षी, ऑक्टोबरमध्ये भारतात प्रांतिक सरकारची स्थापना करण्यात आली. आझाद हिंद फौजेने पराक्रम गाजवत इंफाळ, कोहिमा ताब्यात घेतलं पण युद्ध समाप्त व्हायच्या आधीच आझाद हिंद फौजेचे अस्तित्व समाप्त झालं. 


युद्ध समाप्त झालं, त्यामध्ये जेत्या पक्षातील देश म्हणून ब्रिटन जिंकला. नेताजी त्यांच्या विरोधात लढले होते, त्यामुळे त्यांच्या भविष्याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाला. पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. 1945 साली तैवानमधील एका विमान अपघातात नेताजींचा मृत्यू झाल्याच्या बातम्या आल्या. पण अनेक भारतीयांना त्यावर विश्नास बसला नाही, अनेकांना तर ती गोष्ट आजही पटत नाही. 


आझाद हिंद फौजेच्या अधिकाऱ्यांवर ब्रिटिशांनी देशद्रोहाचा खटला भरला. त्यांच्या विरोधात हत्या, ब्रिटिश शासनाच्या विरुद्ध अवैध युद्ध पुकारणे या आरोपांखाली गुन्हे दाखल करण्यात आले. पण आझाद हिंद फौजेचा पराक्रम हा भारतीय नौसैनिकांसाठी एक प्रेरणा ठरली. इतिहासकार सुमित कुमार यांनी अशी नोंद केली आहे की, नौदलाच्या या उठावाचा अनेकांना जरी विसर पडला असला तरी ही घटना भारतीय स्वातंत्र्यलढ्यात एक महत्त्वाची घटना आहे. पहिल्यांदाच सरकारसाठी काम करणाऱ्या नोकरदार वर्गाने सामान्यांच्या खांद्याला खांदा लावून स्वातंत्र्यासाठी लढा दिला. 


नौदलाच्या या उठावामागे अनेक कारणं होती. त्यामध्ये खोटी आश्वासनं देऊन भरती करणे, चांगलं वेतन नसणे, चांगलं जेवण नसणे तसेच प्रमोशन नाही यासह अनेक कारणांचा समावेश होता. इंग्रजी अधिकारी भारतीय कर्मचाऱ्यांसोबत वर्णभेद करायचे, त्यांना कमी लेखायचे. भारतीय कर्मचाऱ्यांशी इंग्रजाचे वर्तन हे अपमानास्पद असायचं. 


आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी नौदलाने एक नेव्हल स्ट्राईक कमिटी निर्माण केली होती. या समितीच्या मागण्या या वेगळ्याच होत्या. दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर या सैनिकांना पुन्हा घरी परतावं लागणार होतं आणि सर्वसामान्यांचं जीवन जगावं लागणार होतं. म्हणजे त्यांना रोजगाराला मुकावं लागणार होतं. त्याचवेळी त्यांची नियुक्ती ही इंडोशेनियामध्ये करण्यात येणार होती, त्या ठिकाणी त्यांना डच लोकांशी लढावं लागणार होतं. 


नौदलाच्या या आंदोलनाचे केंद्र HMIS तलवार हे जहाज होतं. या जहाजावरचा ब्रिटिश अधिकारी हा वर्णभेदासाठी प्रसिद्ध होता. तो भारतीयांना शिव्या द्यायचा, त्यांना तुच्छ वागणूक द्यायचा. 1 डिसेंबर 1945 रोजी तलवार या जहाजावर एक कार्यक्रम होता, या कार्यक्रमात ब्रिटिशांचे बडे अधिकारी सामिल होणार होते. पण सकाळच्या परेडवेळी ब्रिटिशांना  ‘भारत छोड़ो’, ‘इंकलाब जिंदाबाद', 'साम्राज्यवाद मुर्दाबाद' या घोषणा ऐकायला आल्या. 
या आंदोलनात भाग घेणाऱ्यांनी ही एक क्रांतीच आहे अशी समजूत करुन घेतली आणि त्या पद्धतीनेच वर्तन करू लागले. 


तीनच दिवसात या आंदोलनाने उग्र रुप धारण केलं. यामध्ये 75 जहाजं, 20 नौदलाची केंद्र आणि जवळपास 20 हजार युवा कर्मचारी सामिल झाले. ब्रिटिशांनीही याला उत्तर देण्याची संपूर्ण तयारी केली. त्यांनी रॉयल एअर फोर्सचा वापर करण्यासाठी हालचाली सुरू केल्या होत्या. पण काँग्रेस आणि मुस्लिम लिग या दोन प्रमुख पक्षांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला नाही. पण देशातील सर्वसामान्य नागरिकांनी मात्र नौदलाच्या या उठावाला पाठिंबा दिला. ब्रिटिशांनी या आंदोलकांची अनेक मार्गांनी नाकेबंदी करायचा प्रयत्न केला. पण सामान्य नागरिकांनी याला पाठिंबा दिल्याने हा उठाव जोमात सुरू राहिला. मुंबईतील या उठावाचा परिणाम हा कराची बंदरावरही झाला. कराचीमधील एचएमआयएस हिंदुस्तान या जहाजाचा ताबा तिथल्या भारतीय नौसैनिकांनी घेतला. 


नौदलाच्या या उठावामध्ये जवळपास 400 सैनिकांना आपला जीव गमवावा लागला. पण 23 फेब्रुवारीला हा उठाव अचानक संपला. स्ट्राईक कमिटीला असं भासवण्यात आलं की अरूणा असफ अली यांना सोडलं तर इतर कोणताही नेता त्यांच्यासोबत नाही. नौसेनेच्या उठावाच्या घटनेचे ज्यावेळी विश्लेषण होतं त्यावेळी अनेक राजकीय नेत्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभा केला जातो. नेहरू स्ट्राईक कमिटीला पाठिंबा देणार होते पण पटेलांनी त्यांना घाईगडबडीत कोणतेही पाऊल उचलू नये असा सल्ला दिला होता. त्यानंतर कोणाचाही पाठिंबा मिळाला नसल्याने स्ट्राईक कमिटीने हा उठाव मागे घेतला. 


नंतरच्या काळात उठाव करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नोकरीवरून कमी करण्यात आलं. त्यामुळे त्यांना गावाकडे परत जावं लागलं. ती वेळ अशी होती की देशाची सत्ता ही काँग्रेस आणि मुस्लिम लिगच्या हाती येणार होती. त्यामुळे अशा परिस्थितीत कोणताही सशस्त्र उठाव होऊ नये यासाठी सर्वजण प्रयत्नशील होते. वल्लभभाई पटेल यांनी म्हटलं होतं की, सैन्यामध्ये कोणत्याही बेशिस्त वर्तनाला थारा नसावा, स्वतंत्र भारतात आपल्याला याच सेनेची गरज आहे. 


नौदलाच्या या उठावाला डाव्या पक्षांनी मात्र पाठिंबा दिला होता. पण 1942 सालच्या छोडो भारत आंदोलनाला पाठिंबा न दिल्यांने ते टीकेचे धनी बनले होते. त्यामुळे यावेळी त्यांच्या या भूमिकेवर संशय व्यक्त करण्यात येत होता. 


नौदलाच्या या उठावाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट म्हणजे या उठावात हिंदू आणि मुस्लीम हे खांद्याला खांदा लावून लढले. त्याचवेळी भारतातील काही लोक देशाला हिंदू राष्ट्र बनवण्याच्या तयारीला लागले होते. पण नौदलाच्या या उठावाने ब्रिटिशांची भारतातील सत्ता मात्र खिळखिळी केली, त्याला मोठा धक्का दिला. या व्यतिरिक्त या उठावात अनेक अशा गोष्टी आहेत ज्या अनेकांना प्रेरणा देतील. पण या भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये या उठावाला शेवटच्या पानावर स्थान मिळते, यातील मूळ गाभा दडवलेला आहे हे दुर्दैव आहे.