Pune Bypoll election : चिंचवडचे महाविकास आघाडीचे बंडखोर  (Chinchwad Bypoll Election) उमेदवार राहुल कलाटे (Rahul kalate) यांनी निवडणुकीतून माघार न घेतल्याने त्यांच्याविरोधात बॅनरबाजी करण्यात आली आहे. शिवसेनेकडून ही बॅनरबाजी करण्यात आली आहे.(pune bypoll election)  या बॅनरबाजीमुळे चिंचवडच्या राजकारणानं वेगळं वळण घेतल्याचं स्पष्ट होत आहे. एकदम ओक्के डोक्यातून, असं त्या बॅनरवर लिहिण्यात आलं आहे. त्यामुळे शहरात आता या बॅनरची जोरदार चर्चा सुरु आहे. राहुल कलाटेंच्या या बंडखोरीच्या मागे भाजपचा हात असल्याचं या बॅनरच्या माध्यमातून सांगण्याता प्रयत्न केला जात आहे.


चिंचवड मतदार संघात महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीच्या नाना काटे यांना उमेदवारी देण्यात आल्याने राहुल कलाटे यांनी बंडखोरी केली. शिवसेना नेते संजय राऊत, सचिन आहिर, विरोधी पक्षनेते अजित पवार, आमदार सुनील शेळके यांनी राहुल कलाटेंना उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी विनंती केली होती. शिवाय पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनीदेखील फोन केला मात्र राहुल कलाटे निवडणूक लढवण्यावर ठाम राहिले. त्यानंतर त्यांच्या या बंडखोरी मागचा मास्टरमाईंड कोण? अशा चर्चा रंगल्या. याच दरम्यान या बॅनरने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 


बॅनरमध्ये काय लिहिलंय?


चिंचवड मतदार संघात हे बॅनर लावण्यात आलं आहे. त्यात 'एका पक्षाची उमेदवारी खोक्यातून, नागपूरची गुलामी, ठाण्याची गद्दारी एकदम ओक्के डोक्यातून', असं त्या बॅनरवर लिहिण्यात आलं आहे. 


महाविकास आघाडीची अडचण वाढली?


पोटनिवडणूक जाहीर झाल्यापासून नाना काटे आणि राहुल कलाटे यांच्याच नावाची चर्चा होती. त्यात राहुल कलाटे यांनाच उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता होती. मात्र ऐनवेळी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी आयता उमेदवार नको नाहीतर प्रचार करणार नाही अशी भूमिका घेतली त्यामुळे नाना काटे यांना उमेदवारी देण्यात आली. आता राहुल कलाटे यांनी बंडखोरी केल्यामुळे महाविकास आघाडीचे मतं मोठ्या प्रमाणात फुटण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाविकास आघाडीची अडचण वाढण्याची शक्यता आहे. 


बंडखोरीचं कारण काय?


2019 मध्ये राहुल कलाटे हे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या विरोधात अपक्ष लढले होते. त्यावेळी त्यांना लाखांमध्ये मतं मिळाले होते. यात काही हजारांच्या मतांनी त्यांचा पराभव झाला होता. सध्या राष्ट्रवादीकडून उमेदवार असलेल्या नाना काटेंनादेखील राहुल कलाटेंपेक्षा कमी मतं मिळाले होते. त्यामुळे राहुल कलाटेंना नागरिकांचं मोठं समर्थन असल्याचं समोर आलं आहे. या वेळीदेखील यात समर्थकांच्या जोरावर त्यांनी बंडखोरी करण्याचा निर्णय घेतला आहे.