मुंबई : प्रियंका आणि रॉबर्ट... देशाच्या राजकीय वर्तुळातलं हायप्रोफाईल कपल... प्रियंका देशातल्या सर्वात प्रभावशाली घराण्याची लेक, तर रॉबर्ट वाड्रा प्रख्यात आणि वादग्रस्त उद्योगपती... त्यांची हीच ओळख प्रियंका गांधी यांच्या मार्गातला अडसर ठरण्याची शक्यता आहे.


प्रियंका आणि रॉबर्ट वाड्रा यांची पहिली भेटच वादग्रस्त मानली जाते. बोफोर्स प्रकरणातील आरोपी ओतावियो क्वात्रोचीच्या घरी या दोघांची ओळख झाली. बहीण मिशेलच्या माध्यमातून हे दोघे एकमेकांचे मित्र झाले. 1997 साली या दोघांनी लग्नगाठ बांधली.

त्यानंतर रॉबर्ट वाड्राच्या आयुष्यात वादळांची मालिका सुरु झाली. वैवाहिक जीवनात सुखी असलेल्या रॉबर्टच्या घरी मात्र मृत्यूचं सत्र सुरु झालं. 2001 साली रॉबर्ट यांची बहीण मिशेल यांचा अपघाती मृत्यू झाला. 2003 साली रॉबर्टचे बंधू रिचर्ड यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत घरी सापडला. तर 2009 साली रॉबर्टच्या वडिलांनीही आत्महत्या केली.

दुसरीकडे रॉबर्ट यांचे संबंध थेट देशातल्या सर्वात मोठ्या राजकीय कुटुंबाशी बांधले गेल्याने आरोपांचा सिलसिला सुरु झाला. 2002 साली गांधी नेहरु घराण्याचं नाव वापरुन आपली कामं करुन घेतल्याचा आरोप वाड्रांवर झाला. 2012 साली आम आदमी पक्षाने वाड्रांवर डीएलएफ डीलचे आरोप केले. 65 कोटींचं बिनव्याजी कर्ज डीएलएफ कंपनीने वाड्रांना दिल्याचा आरोप केला. त्याबदल्यात हरयाणा सरकारकडून डीएलएफची काम करवून घेतल्याचा आरोप होता.

त्यावेळी वाड्रांनी 'मॅंगो पिपल इन बनाना रिपब्लिक दॅट इज आम आदमी' असा ट्विट टाकून मोठाच वाद निर्माण केला होता. मात्र नंतरच्या हरयाणा निवडणुकात भाजपने डीएलएफ डीलचं मोठं भांडवल केलं होतं. वाड्रांना मिळणाऱ्या व्हीव्हीआयपी ट्रीटमेंटवरुनही टीका झाली. त्यांनी विमानतळावर विना सुरक्षा पडताळणी जाता येतं यावरुनही त्यांच्यावर टीका झाली. लंडनमध्ये अवैध शस्त्र विकाणाऱ्या व्यक्तीकडून घर खरेदी केल्याचा आरोपही भाजपने केला. इतके डाग लागलेल्या माणसासोबत संसार करणाऱ्या प्रियंका गांधी यांची पुढची वाटचालही तितकीच खडतर असणार आहे, हे नक्की