मी लोकसभा निवडणूक लढवली, तर आजही जिंकेन. मला पहिल्यांदा संधी मिळाली तेव्हा मी चार महिन्यांची गर्भवती होते. तेव्हा तर 'हो-नाही' बोलण्याची वेळ आणि संधी नव्हती. जबाबदारी आली, ती घेतली. पण आता माझी मुलं आहेत. नुसतं निवडणूक जिंकून होणार नाही. पाच वर्ष काम केलं पाहिजे, नाहीतर ते अन्यायकारक ठरेल. म्हणून मी आता निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला, मात्र पक्ष जी जबादारी देईल, ती मी पार पाडेन, असं प्रिया दत्त यांनी स्पष्ट केलं.
यावेळी निवडणुकीच्या रिंगणात न उतरण्याचा निर्णय प्रिया दत्त यांनी जाहीर केला आहे. गेल्यावेळी म्हणजेच 2014 मधील लोकसभा निवडणुकीत प्रिया दत्त उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातून निवडणुकीला उभ्या राहिल्या होत्या. मात्र भाजपच्या पूनम महाजन यांच्याकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला. यावेळी अभिनेत्री नगमा यांनी मतदारसंघावर दावा सांगितला आहे.
'दत्त' आडनाव का लावलं, लग्न झालं आहे, म्हणून माझ्यावरही टीका झाली. प्रत्येक व्यक्तीला आपलं आडनाव निवडण्याचा अधिकार आहे. घराणेशाही फक्त राजकारणात नाही सर्वच क्षेत्रात आहे, असंही प्रिया दत्त म्हणाल्या.
प्रियांका गांधी या आधीही काँग्रेसमध्ये संघटनात्मक काम करत होत्या. त्या निर्णयप्रक्रियेत सहभागी होत्या. मात्र आता त्या राजकारणात सक्रिय व्हायला तयार झाल्या आहेत. आधी कुटुंब आणि मुलांची जबाबदारी होती. मात्र आता त्यांनी तयारी दाखवताच संधी मिळाली, असंही प्रिया दत्त म्हणाल्या.
प्रियांका गांधीकडे एक 'ऑरा' (वलय) आहे. त्यांच्यामध्ये ताकद आहे. त्या जनतेशी पटकन कनेक्ट होतात. लोकांमध्ये मिसळतात, अशा शब्दात प्रिया दत्त यांनी प्रियांकांचं स्वभाव वैशिष्ट्यं सांगितलं.
तुम्ही ज्या कुटुंबात जन्मला आहात, तिथे लहानपणापासून तुम्ही राजकारण पाहिलं आहे. तुम्हाला काही माहित नाही आणि अचानक जबाबदारी देण्यात आली, असं नाही. प्रियांका गांधींना कामाचा अनुभव आहे. पूर्व उत्तर प्रदेशमध्ये जबाबदारी दिली म्हणजे एका रात्रीत चित्र बदलत नाही, याकडे प्रिया दत्त यांनी लक्ष वेधलं. पक्षबांधणीला मदत व्हावी म्हणून प्रियांका गांधींकडे जबाबदारी दिल्याचं प्रिया दत्त म्हणाल्या.
राहुल गांधी यांनी प्रियांकांकडे ही जबाबदारी दीर्घकाळासाठी दिली आहे, फक्त दोन महिन्यांसाठी नाही. राहुल गांधींनी याआधी उत्तर प्रदेशात स्वबळावर निवडणूक लढायचा निर्णय घेतला होता. त्यावर टीका झाली होती. आताही स्वबळावर लढवणार आहोत, असं प्रिया दत्त यांनी स्पष्ट केलं.