मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजप, शिवसेना आणि घटकपक्षांच्या युतीचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाल्याची चर्चा सध्या सुरु आहे. काल (बुधवारी) भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्यात जागावाटपाबाबत चर्चा झाली. या चर्चेत जागावाटपाबाबत प्राथमिक चर्चेतला फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती मिळाली आहे.


महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांपैकी भाजप-शिवसेना 270 जागा तर घटक पक्ष 18 जागा लढण्याची शक्यता आहे. त्यामध्ये भाजप 160, शिवसेना 110 आणि घटक पक्ष 18 जागा लढतील, असा प्राथमिक चर्चेतला फॉर्म्युला आहे.

कालच्या चर्चेत घटक पक्षांना जास्तीत जास्त 18 जागा देण्यावर दोन्ही पक्षांचं (शिवसेना - भाजप) एकमत झाल्याची चर्चा आहे. त्यानंतर 270 जागांपैकी किती जागा वाटून घ्यायच्या यावर दोन्ही पक्षांमध्ये चर्चा झाली.

288 पैकी 160 पेक्षा जास्त जागा भाजपला देण्यास शिवसेना राजी नाही. याचाच अर्थ शिवसेना स्वत: 110 जागा लढवण्यासाठी तुर्तास तरी तयार आहे. त्यामुळे 160 +110 + 18 = 288 असा युतीचा प्राथमिक चर्चेतला फार्म्युला आहे. परंतु अंतिम फार्म्युला ठरणं अद्याप बाकी आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्यात अंतिम चर्चा होईल.

दरम्यान, 13 सप्टेंबर रोजी विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागणार असल्याची माहिती केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली आहे. सोमवारी जालना येथे विविध महामंडळावर नियुक्त झालेल्या सदस्यांचा ओबीसी समाजातर्फे जाहीर सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात ते बोलत होते.

विधानसभा निवडणुकीत महायुतीला 229 जागा मिळणार, भाजपच्या सर्व्हेतील अंदाज

पुढच्या वर्षीही वर्षावर गणपती बाप्पांचं स्वागत करु, मुख्यमंत्र्यांचा विश्वास