मुंबई : लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर शिवसेनेने ट्रम्प कार्ड खेळलं आहे. यशस्वी निवडणूक प्रचार रणनीतीकार अशी ख्याती असलेल्या प्रशांत किशोर यांना 'मातोश्री'वर निमंत्रित करण्यात आलं होतं.


2019 मधील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या प्रचाराचं शिवधनुष्य प्रशांत किशोर उचलणार आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने ही आक्रमक रणनीती आखल्याने युतीचं काय होणार, हा प्रश्न कायम आहे.



प्रशांत किशोर यांनी 2014 मधील लोकसभा निवडणुकीत भाजपला स्वबळावर घवघवीत यश मिळवून दिलं होतं. त्यानंतर 2018 मध्ये त्यांनी जेडीयूमध्ये प्रवेश करत उपाध्यक्षपद भूषवलं.

'मातोश्री'वर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या सोबत प्रशांत किशोर यांनी  महत्त्वाची चर्चा केली. त्यानंतर शिवसेना नेते, खासदार आणि युवासेना कार्यकारिणीसोबत त्यांची महत्त्वाची बैठक झाली. बैठकीत शिवसेनेच्या लोकसभा निवडणूक प्रचार रणनीतीवर महत्त्वाची चर्चा झाल्याची माहिती आहे.

'मातोश्री'वर शिवसेना खासदारांच्या बैठकीला हेमंत गोडसे, गजानन कीर्तिकर, शिवाजी आढळराव पाटील, चंद्रकांत खैरै, राहुल शेवाळे, अरविंद सावंत, अनंत गीते, संजय राऊत, श्रीकांत शिंदे यांच्यासोबत रामदास कदम, संजय राठोड, निलम गोऱ्हेही उपस्थित होते.

प्रशांत किशोर यांची कारकीर्द



निवडणुकीत आपल्या आगळ्यावेगळ्या आणि परिणामकारक प्रचार मोहिमेसाठी ओळखल्या जाणाऱ्या प्रशांत किशोर यांनी देशभरातील विविध पक्षांच्या नेत्यांसाठी काम केलं आहे.

प्रशांत किशोर यांनी 2014 च्या लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान नरेंद्र मोदींसाठी काम केलं. ‘चाय पे चर्चा’ सारखा हिट कार्यक्रम असो की ‘अब की बार...’ सारख्या घोषणा या प्रशांत किशोर यांनी आखलेल्या रणनीतीचाच भाग होत्या.

2014 साली लोकसभा निवडणुकीत भाजपसाठी निवडणूक रणनितीकार म्हणून काम केल्यानंतर प्रशांत किशोर हे नितीश कुमार यांच्या संपर्कात आले.

बिहार विधानसभा निवडणुकीत प्रशांत किशोर यांनी नितीश कुमार यांना साथ दिली. नितीश कुमार आणि लालूप्रसाद यादव एकत्र येण्यातही प्रशांत यांचा मोठा वाटा होता.

2015 साली बिहारमधील विधानसभा निवडणुकीत त्यांनी जेडीयूसाठी रणनिती आखली. 'बिहार में बाहर हो, नितीश कुमार हो' यासारख्या घोषणा प्रशांत किशोर यांचीच कल्पना आहे.

पंजाब आणि उत्तर प्रदेश विधानसभांच्या निवडणुकांसाठी प्रशांत किशोर यांनी राहुल गांधी यांच्यासोबत काम केलं होतं.

16 सप्टेंबर 2018 रोजी निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांनी नितीश कुमार यांच्या जनता दल यूनायटेड या पक्षात प्रवेश केला.
संबंधित बातम्या :

प्रशांत किशोर जेडीयूच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी