मुंबई : टीव्ही कलाकारांना आपल्या मानधनातून निर्मात्यांना डिस्काऊंट द्यावा लागतो असा आरोप अभिनेत्री अमृता संत हीने केला आणि एबीपी माझाने ही बातमी दाखवताच सोमवारी प्रॉडक्शन हाऊसने तिच्या नावाचा डीडी काढला आहे. कलाकारांना वेळेवर मानधन मिळत नाही, जे मिळतं त्यातही निर्मात्यांना डिस्काऊंट द्यावा लागतो असा आरोप करत सहा महिन्यांपासून आपलं मानधन न मिळाल्याचा दावाही अमृताने केला होता.


प्रेमा तुझा रंग कसा? या मालिकेत अमृताने एक छोटीशी भूमिका केली होती. अमृताने काम केलेला हा एपिसोड त्याच महिन्यात ऑनएअर गेला होता. मात्र नोव्हेंबर महिन्यापर्यंत अमृताला तिचं मानधन मिळालं नाही. शेवटी कंटाळून अमृताने प्रॉडक्शन हाऊसशी संपर्क केला. यावेळी तिला लवकरच तिला पैसे मिळतील असं सांगण्यात आलं. यानंतरही अमृताला मानधन मिळालंच नाही आणि तिचा फोन उचलणंही प्रॉडक्शनने बंद केलं.


जानेवारीमध्ये तब्बल पाच महिन्यांनी प्रॉडक्शन हाऊसने तिचा फोन उचलला. यावेळी तिला तिचं थकलेलं मानधन हवं असेल तर 20 टक्के डिस्काऊंट द्यावाच लागेल असं धमकीवजा आवाजात सांगण्यात आल्याचा आरोप अमृताने केला.  तसंच इतर कलाकारही डिस्काऊंट देत असल्याचं अमृताला सांगण्यात आला.

ही गोष्ट एबीपी माझाच्या माध्यमातून अमृताने लोकांसमोर आणल्यानंतर काल सोमवारी तिच्या मानधनाचा डीडी प्रॉडक्शन हाऊसकडून काढण्यात आला आहे.



लागीर झालं जी मालिकेतील मामी आणि जयडी यांनाही अशाच कारणातून मालिका सोडावी लागली होती.