सांगली : लोकसभेसाठी सांगलीचे स्वाभिमानीचे उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचारार्थ सुपरस्टार जयकांत शिकरे फेम प्रकाश राज यांचा मिरजेत भव्य रोड शो पार पडला.  या रोड शोला सांगलीकरांची तुफान गर्दी उसळली होती.


बॉलिवूडचे सुप्रसिद्ध अभिनेते आणि कर्नाटकच्या बंगळुरुमधून लोकसभा निवडणूक लढवत असलेले प्रकाश राज आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचारार्थ सांगलीच्या मिरजेत आले होते.  यावेळी प्रचारासाठी मिरजेत प्रकाश राज यांच्या सभेचे आयोजन करण्यात आलं. तत्पूर्वी प्रकाश राज यांचा मिरजेत रोड शो पार पडला.

मिरजेच्या गांधी चौकातून या रॅलीला सुरुवात झाली. यावेळी स्वाभिमानीचे राजू शेट्टी, विशाल पाटील आणि इतर नेतेही उपस्थित होते. शहरातील प्रमुख मार्गावरून निघालेल्या या रॅलीला स्थानिकांचा तुफान प्रतिसाद मिळाला. आता माझी सटकली, जयकांत शिकरे, आली रे आली, आता माझी बारी आली, अशा घोषणाबाजीने तरुणाईने एकाच गलका केला होता.