मुंबई : न्यूझीलंडची हेली जेन्सन आणि ऑस्ट्रेलियाची निकोला हॅन्कॉक, आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये आपला ठसा उमटवणाऱ्या या क्रिकेटपटूंनी चक्क लगीनगाठ बांधली आहे. या जोडप्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर होत आहे. न्यूझीलंडमध्ये 2015 पासून समलैंगिक विवाह वैध आहेत.


हेली न्यूझीलंड संघाची नावाजलेली अष्टपैलू खेळाडू तर निकोला हॅन्कॉक ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज आहे. हेलीने 7 वनडे आणि 20 टी20 सामन्यात देशाचं प्रतिनिधित्व केलं आहे. तर निकोला हॅन्कॉक प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये खेळते. ऑस्ट्रेलियातल्या वुमन्स बिग बॅश लीग या दोघांची पहिल्यांदा ओळख झाली आणि इथेच हेली आणि निकोलाचं नातं खुललं. या दोघींनी बिग बॅशच्या पहिल्या दोन्ही मोसमात मेलबर्न स्टार्सचं प्रतिनिधित्व केलं होतं.


निकोला आणि हेली वेगवेगळ्या देशाच्या जरी असल्या तरी प्रेमाच्या ताकदीने या दोघांनाही एका धाग्यानं गुंफलं. हेली जेन्सन आणि निकोला हॅन्कॉकचा समलैंगिक विवाह ही क्रिकेटविश्वातली पहिली घटना नाही. याआधी दक्षिण आफ्रिकेची कर्णधार डेन निकर्क आणि मेरिझेन कॅप यांनी जुलै 2018 साली लग्नगाठ बांधली होती.

रेशीमगाठी स्वर्गात बांधल्या जातात म्हणतात ना- तसंच या दोघींचं ख्रिश्चन वेडिंग अगदी स्वर्गमय वातावरणात पार पडलं. विशेष म्हणजे निकोलाने हेलीचं आडनावही घेतलं आहे. निकोला आणि हेलीच्या नात्यामुळे जगाला क्रीडाविश्वातली आणखी एक नवी कोरी लव्हस्टोरी मिळाली आहे.