अकोला : सोलापुरात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांना भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्याकडून आव्हान मिळणार आहे. कारण आपण सोलापुरातून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. अकोल्यातील आपल्या निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.


सोलापुरात काँग्रेसकडून सुशीलकुमार शिंदे यांना उमेदवारी मिळणार असल्याचं जवळपास निश्चित आहे. त्यामुळे सोलापुरात आता सुशीलकुमार शिंदे विरुद्ध प्रकाश आंबेडकर असा हायव्होल्टेज लढत रंगण्याची शक्यता आहे.

दरम्यान, प्रकाश आंबेडकरांनी सोलापुरातून निवडणूक लढवावी, असा आग्रह वंचित बहुजन आघाडीचे नेते लक्ष्मण माने यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. स्वत: आंबेडकरांनीही त्याला दुजोरा दिला आहे.

दोन मतदारसंघातून लढणार?
दरम्यान, अकोला हा प्रकाश आंबेडकरांना पारंपरिक मतदारसंघ आहे. आता सोलापुरातून निवडणूक लढवणार असल्याचं ते म्हणाले. "आजपर्यंत तरी सोलापुरातून लढण्यावर ठाम आहे. उद्याचं सांगता येणार नाही," असं म्हणत प्रकाश आंबेडकरांनी यावर काहीशी साशंकताही कायम ठेवली आहे. त्यामुळे आंबेडकर अकोला आणि सोलापूर या दोन मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे.

प्रकाश आंबेडकर सोलापुरातून निवडणूक लढवणार


संभाव्य आघाडीची चर्चा मावळली
महाआघाडीत समावेश होण्यासंदर्भातील बैठकीत 22 जागा मिळाव्यात अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीने घेतली होती. मात्र आता आंबेडकरांनी सोलापुरातून निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबतची संभाव्य महाआघाडीची शक्यता मावळल्याचं म्हटलं जात आहे. उद्या काँग्रेसची वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांसोबत उच्चस्तरीय चर्चा होणार आहे. त्या बैठकी महाआघाडीबाबतचा अंतिम निर्णय होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

आता काय बोलणार? : अशोक चव्हाण
आंबेडकरांनी आमच्याच पक्षाच्या ज्येष्ठ नेत्याविरुद्ध लढण्याची तयारी  केली आहे, तर आता पुढे काय बोलायचं? यापुढे काय भूमिका घ्यायची याचा निर्णय पक्षातील इतर नेत्यांशी बोलून घेतला जाईल, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली आहे.

संबंधित बातम्या

वंचित बहुजन आघाडीची काँग्रेस-राष्ट्रवादीकडे जाहीर केलेल्या 22 जागांची मागणी

मला ट्रोल करणाऱ्यांना ठोकून काढा : प्रकाश आंबेडकर

राहुल गांधी- प्रकाश आंबेडकर यांची भेट होण्याची शक्यता, काँग्रेस-राष्ट्रवादीचं आंबेडकरांना पत्र

प्रकाश आंबेडकर लोकसभा निवडणूक लढवणार, मतदारसंघाबाबत म्हणतात...