पंढरपूर : पाणी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते प्रफुल्ल कदम यांनी लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याविरोधात शड्डू ठोकला आहे. पंढरपुरातील वाटंबरे इथे काल (10 मार्च) झालेल्या मेळाव्यात प्रफुल्ल कदम यांनी आपल्या उमेदवारीची घोषणा केली. शरद पवार माढा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. तर प्रफुल्ल कदम अपक्ष निवडणूक लढवणार आहेत.


टाटाच्या धरणातील पाणी शेतीला देण्याबाबत लढा उभा करणारे वॉटर किसान आर्मीचे संस्थापक प्रफुल्ल कदम यांनी काल सांगोला तालुक्यातील वाटंबरे इथे रात्री आयोजित केलेल्या मेळाव्याला शेतकरी आणि तरुण वर्गाने मोठा प्रतिसाद दिला.

शरद पवार यांनी 2009 च्या निवडणुकीत मावळत्या सूर्याला साक्षी ठेवून दिलेल्या आश्वासनांपैकी एकही आश्वासन पाळलं नाही. तर भाजपचे उमेदवार म्हणजे नुरा कुस्तीचे उमेदवार आहेत. त्यामुळे दुष्काळी माढा लोकसभा मतदारसंघातून आपल्या उमेदवारीची मागणी होत असल्याने आपण निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याचं कदम यांनी सांगितलं.

आपण जनतेच्या निधीवर आणि पाठिंब्यावर अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचंही कदम यांनी नमूद केलं. माढा मतदारसंघातील 860 गावाशी पाणी चळवळीमुळे आपला थेट संबंध असून ही जनताच आता या मतदारसंघात इतिहास घडवेल, असा विश्वास प्रफुल्ल कदम यांनी व्यक्त केला.