मुंबई : काँग्रेसकडून सतत संदेश येत होते की सामंजस्यपूर्ण चर्चा झाली पाहिजे. मात्र वंचित आघाडीकडून दिलेला प्रस्ताव धुडकावत काँग्रेसचे वंचित आघाडीच्या उमेदवारांना उमेदवारी देण्यास नकार दिला, असं प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलं आहे. काँग्रेसच्या या भूमिकेमुळे चर्चेचे सर्व प्रस्ताव संपले आहेत आणि आता काँग्रेससोबत चर्चा होणं शक्य नाही असं म्हणत येत्या 15 तारखेला राज्यातील सर्व 48 जागांवर वंचित आघाडीकडून उमेदवार जाहीर केले जातील असंही त्यांनी जाहीर केलं आहे.


याबाबत पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, काँग्रेससोबत झालेल्या बैठकीला वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अण्णाराव पाटील, लक्ष्मणराव माने आणि इतरांची बैठक झाली. यावेळी काँग्रेसच्या प्रतिनिधींना सांगण्यात आलं की वंचित आघाडीने  आपले 22 उमेदवार जाहीर केले आहेत. आम्ही माघार घेऊ शकत नाही. या परिस्थितीत आम्ही एवढंच करु शकतो की या 22 उमेदवारांपैकी तुम्हाला जे उमेदवार हवेत ते घ्या काँग्रेसचा एबी फॉर्म त्यांना द्या, निवडणुकीचं चिन्हही द्या. आमची काही हरकत नाही आणि उमेदवारांचीही हरकत राहणार नाही असा प्रस्ताव देण्यात आला.

काँग्रेसना हा प्रस्ताव धुडकावत हे उमेदवार आपल्यातील नसल्याचं सांगितलं. आम्ही आमच्यामध्ये असणाऱ्यांना उमेदवारी देऊ दावाही प्रकाश आंबेडकर यांनी केला. काँग्रेसला सामाजिक दृष्टीकोनातून समाजातील विविध समुहांना उमेदवारी दिली पाहिजे असं दिसत नसल्यामुळे या चर्चा पुढे जाऊ शकल्या नाहीत आणि म्हणूनच 15 तारखेला वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महाराष्ट्रातील सर्वच 48 जागा जाहीर केल्या जातील, असंही त्यांनी सांगितलं.