पणजी : मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या प्रकृतीमध्ये होत असलेल्या चढ उताराच्या पार्श्वभूमीवर भाजपाने आपल्या सर्व आमदारांची आज सायंकाळी भाजप मुख्यालयात तातडीची बैठक बोलावली. तर दुसऱ्या बाजूने विरोधी काँग्रेस पक्षाने सरकार स्थापनेचा दावा केला आहे. सरकारमधील सहा बिगरभाजपा मंत्री आणि आमदार संघटीत झाले असून सगळ्यांनी एकत्रितपणे मुख्यमंत्री पर्रिकर यांची भेट घेतल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे.


मनोहर पर्रिकर यांच्या तब्येतीबाबत आज दिवसभर उलट सुलट चर्चा सुरु होती. सकाळी मनोहर पर्रिकर यांची प्रकृती बिघडल्याचे वृत्त येताच भाजपचे माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्ळ्येकर यांनी पर्रिकर यांच्या दोनापावल येथील खासगी निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. पर्रीकर यांची प्रकृती स्थिर आहे, असा दावा कुंकळ्ळ्येकर यांनी सकाळी केला होता.

मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयानेही पर्रिकर यांची प्रकृती स्थिर असल्याचे ट्वीट करून सांगितले. मात्र भाजपच्या ऐकूण हालचाली बघता मोठ्या राजकीय हालचाली सुरु असल्याचे संकेत मिळाले आहेत. तर सायंकाळी पक्षाचे संघटन मंत्री सतिश धोंड यांनी राजभवनवर जाऊन राज्यपालांची भेट घेतली.

भाजपकडे सध्या 13 आमदार आहेत. भाजपने आपल्या 11 आमदारांची एकत्र बैठक घेतली. आरोग्यमंत्री विश्वजीत राणे हे सध्या विदेशात आहेत. कुणीच भाजप आमदाराने या दोन-तीन दिवसांत गोव्याबाहेर जाऊ नये अशी सूचना सर्व आमदारांना करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. पर्रिकर सरकारमधील मंत्री विजय सरदेसाई, रोहन खंवटे, विनोद पालयेकर, गोविंद गावडे, जयेश साळगावकर आणि आमदार प्रसाद गावकर हे पुन्हा एकदा  एकत्र आले असून त्यांनी एकत्रितपणे मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे.

विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांनी राज्यपालांना पत्र पाठवून दिले आहे. काँग्रेसकडे बहुमत असून विधानसभा विसर्जित केली जाऊ नये अशी काँग्रेसची भूमिका आहे. राष्ट्रपती राजवट लागू न करता आम्हाला सरकार स्थापनेची संधी दिली जावी, अशी मागणी कवळेकर यांनी केली आहे. काँग्रेसने राज्यपालांकडे प्रत्यक्ष भेटीसाठीही वेळ मागितली आहे.