लखनौ : लोकसभेसाठी यूपीमधील रामपूरमध्ये अभिनेत्री जयाप्रदा आणि समाजवादी पक्षाचे आझम खान यांच्यात लढत होण्याची शक्यता आहे. भाजपने जयाप्रदा यांना रामपूरमधून उमेदवारी देण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत, तर आझम खान यांना समाजवादी पार्टी मैदानात उतरवण्याच्या तयारीत आहे. असं झालं तर जयाप्रदा आणि आझम खान यांच्यातील लढत औत्सुक्याची बाब ठरेल.


रामपूरमधून अभिनेत्री जयाप्रदा दोनवेळा खासदार राहिल्या आहेत. तर समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते आझम खान रामपूरमधून नवव्या वेळी आमदार राहिले आहेत. तसंच त्यांचा धाकटा मुलगा अब्दुल्ला हासुद्धा आमदार आहे. आझम खान यांनी पक्षाचे तिकीट दिल्यास लोकसभा लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

नैपाल सिंह रामपूरमधील भाजप खासदार आहेत, मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना उमेदवारी मिळण जवळपास अशक्य समजलं जात आहे. रामपूरमध्ये मुस्लीमांचं मताधिक्य विचारात घेता प्रत्येक पक्ष तुल्यबळ उमेदवार देण्यासाठी आटापिटा करत आहे. भाजपचा शोध जयाप्रदांवर येऊन संपल्याचं बोललं जात आहे. भाजपला जयाप्रदांकडून मोठ्या विजयाच्या अपेक्षा आहेत. भाजपच्या रामपूरमधील पदाधिकाऱ्यांनी खासदार नैपाल सिंह यांचा मुलगा सौरभ आणि जयाप्रदांच्या नावाचा विचार चालवला आहे. यात जयाप्रदांचं पारडं जड आहे.

जयाप्रदा आणि आझम खान यांच्यातील वाद फार जुना आहे. 2009 सालच्या लोकसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाकडून मुलायम सिंह यादवांनी आझम खान यांचा विरोध झुगारुन जयाप्रदांना उमेदवारी दिली होती. प्रचारावेळी जयाप्रदा रामपूरला पोहोचल्या मात्र आझम खान आणि त्यांच्या समर्थकांनी जयाप्रदांच्या विरोधात मोहीमच उघडली. नचनिया पासून ते घुंगरुवाली पर्य़ंत अनेक पोस्टर्स शहरात लावले गेले. मात्र जयाप्रदा प्रचारादरम्यान आझम खान यांना भैया म्हणजेच भाऊ म्हणत राहिल्या आणि अखेरीस जयाप्रदा 30 हजार मतांनी निवडणूक जिंकल्या.

आज जरी जयाप्रदा आणि आझम खान यांच्यात टोकाचे वाद असले तरीही आझम खानच जयाप्रदांना रामपूरमध्ये घेऊन गेले होते. आझम खान यांच्यामुळेच जयाप्रदांना 2004 साली लोकसभेचं तिकीट मिळालं होतं. आझम खान यांच्यामुळेच 2004 साली जयाप्रदा पहिल्यांदाच खासदार बनल्या. मात्र त्यानंतर त्यांच्यातील वाद संपूर्ण देशात चर्चेचा विषय ठरली आहे.