नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचा निकाल हाती आल्यानंतर नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींनी वेग धरला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे आपल्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आहे. नरेंद्र मोदींनी राष्ट्रपतींना 16 वी लोकसभा विसर्जित करण्याची शिफारसही केली आहे.


राष्ट्रपतींनी नवीन सरकार स्थापन होईपर्यंत आणि कार्यभार सांभाळेपर्यंत पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाने काम सुरु ठेवावं, असं राष्टपतींनी म्हटलं आहे. त्याआधी पंतप्रधान कार्यालयात केंद्रीय कॅबिनेटची बैठक पार पडली. बैठकीत 16 वी लोकसभा विसर्जित करण्याची शिफारस करण्याचा निर्णय घेण्यात आला. कॅबिनेटची शिफारस राष्ट्रपतींना पाठवण्यात आली, त्या आधारावर 16 वी लोकसभेचा कार्यकाळ पूर्ण झाल्याची घोषणा केली जाईल. 3 जूनपर्यंत सध्याच्या लोकसभेचा कार्यकाळ आहे.





17 व्या लोकसभेची स्थापना 3 जूनच्या आधी केली जाणार आहे. त्यानंतर पुढील काही दिवसात नव्या मंत्रिमंडळाची स्थापना होईल. मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 मे रोजी राष्ट्रपतींना भेटून सरकार स्थापनेचा दावा करतील आणि 30 मे रोजी संध्याकाळी शपथविधीचा कार्यक्रम होईल. 28 मे रोजी नरेंद्र मोदी वाराणसीला जाणार आहेत. त्यानंतर 29 मे रोजी मोदी अहमदाबादला आईचा आशीर्वाद घेण्यासाठी जातील.



लोकसभा निवडणुकीत भाजपने 303 जागांवर विजय मिळवला आहे. तर एनडीएने एकूण 352 जागा जिंकल्या आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान असणार आहे. मात्र नव्या मंत्रिमंडळात कोणाला संधी मिळाणार हे लवकरच स्पष्ट होईल.