वाराणीस : लोकसभेच्या ऐतिहासिक विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी धन्यवाद रॅलीसाठी वाराणसीत आहेत. भाजपसाठी प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर पंतप्रधान मोदी पहिल्यांदा वाराणसी येथे पोहोचले आहेत.  या दौऱ्यात पंतप्रधान मोदी प्रथम काशीविश्वेश्वराचं दर्शन घेत पूजा केली. शिवाय काशीचा कोतवाल असलेल्या कालभैरवाचंही दर्शन घेतलं.


नरेंद्र मोदींच्या स्वागतासाठी वाराणसी शहरभर सजावट करण्यात आली असून, फुलांचा वर्षाव होणार आहे. पोलीस लाईन ते विश्वनाथ मंदिरामधील सात किमीचं अंतर ते बंद गाडीतून पार केलं.  पंतप्रधान नरेंद्र मोदी काशीविश्वनाथ मंदिरात त्यांच्यासोबत भाजपचे अध्यक्ष अमित शहा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथसुद्धा बरोबर होते.


उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक, भाजप अध्यक्ष अमित शाह नरेंद्र मोदींच्या स्वागतासाठी विमानतळावर उपस्थित होते. त्यानंतर वाराणसीत पंडित दीनदयाल हस्तकला संकुलात भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशीही मोदी संवाद साधणार आहेत. तसेच कार्यकर्त्यांनी राज्यापासून ते जिल्ह्यापर्यंत केलेल्या कामाचंही मोदी गौरव करणार आहे.

त्याचबरोबर केंद्रात भाजपचा स्वबळावर सत्ता मिळाल्यानंतर आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला राम मंदिर पूर्ण होण्याची आशा आहे. तसे संकेत सरसंघचालक मोहन भागवत यांनी दिले आहेत. रामाचं काम करायचं आणि ते सगळ्यांना मिळून करायचं असं वक्तव्य भागवत यांनी केलं आहे. उदयपूरमध्ये आयोजित रामकथा कार्यक्रमात भागवत बोलत होते. संघ परिवाराकडून राम मंदिराचं बांधकाम सुरु करण्यासाठी केंद्र सरकारने त्यावर आता अध्यादेश काढावा असा आग्रह भागवतांनी केला होता.

VIDEO | देशभरातील बातम्यांचा वेगवान आढावा | बातम्या सुपरफास्ट | एबीपी माझा



30 मे रोजी नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार

दरम्यान दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाच्या खुर्चीवर विराजमान होण्यासाठी नरेंद्र मोदी 30 मे रोजी संध्याकाळी 7 वाजता पदाची आणि गोपनियतेची शपथ घेणार आहेत. राष्ट्रपती भवनात शपथविधी हा सोहळा पार पडणार आहे. राष्ट्रपती भवनाच्या अधिकृत ट्विटर हँडलरवरून ही माहिती देण्यात आली आहे. नरेंद्र मोदींचा शपथविधी 30 मे रोजी होणार यासंदर्भातलं सर्वात पहिलं वृत्त एबीपी माझानं दिलं होतं. राष्ट्रपती भवनाच्या ट्विटनं त्यावर शिक्कामोर्तब केलं आहे.