नवी दिल्ली : माजी क्रिकेटर आणि पूर्व दिल्ली लोकसभा मतदार संघातील भारतीय जनता पक्षाचा उमेदवार गौतम गंभीरविरोधात आम आदमी पार्टीने तीस हजारी कोर्टात तक्रार दाखल केली आहे. मतदार यादीत गौतम गंभीरचे नाव दोन वेळा नोंदवण्यात आले असून त्याच्याकडे दोन मतदार ओळखपत्र असल्याचा आम आदमी पार्टीचा दावा आहे. याप्रकरणी 1 मे रोजी कोर्टात याप्रकरणी सुनावणी होणार आहे.

पूर्व दिल्ली मतदार संघातील आम आदमी पार्टीच्या उमेदवार आतिशी याबाबत म्हणाल्या की, दोन ओळखपत्र बाळगणे हा गुन्हा असून गंभीरला निवडणूक लढवण्यास अयोग्य ठरवायला हवे. आम्ही गंभीरविरोधात तीस हजारी कोर्टात याबाबततक्रार दाखल केली आहे.

आतिशी यांनी दावा केला आहे की, दिल्लीतल्या राजेंद्र नगर आणि करोल बाग अशा दोन मतदार संघांमधील मतदार यादीत गौतम गंभीरचे नाव आहे. आतिशी याबाबत म्हणाल्या की, गंभीरला याप्रकरणी एक ते तीन वर्षांपर्यंतच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.


आतिशी यांनी याबाबत एका ट्वीटद्वारे माहिती दिली आहे. ट्वीटमध्ये त्यांनी पूर्व दिल्ली मतदार संघातील मतदारांना आव्हान केले आहे की, गौतम गंभीरला मतदान करुन आपले मत व्यर्थ जाऊ देऊ नका. गंभीरला दोन मतदार ओळखपत्र बाळगल्याप्रकरणी शिक्षा होऊ शकते.