नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसने मास्टरस्ट्रोक खेळत प्रियांका गांधी यांना काँग्रेसच्या सरचिटणीसपदी निवड केली. प्रियांकांच्या नियुक्तीवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नाव न घेता काँग्रेसवर निशाणा साधला आहे. 'देशात अनेक जणांसाठी कुटुंबच पक्ष असतो, मात्र भाजपमध्ये पक्षच कुटुंब आहे' असं मोदी म्हणाले.

'एखाद्या व्यक्तीला किंवा कुटुंबाला काय वाटतं? यावरुन आपल्या पक्षात एखादा निर्णय घेतला जात नाही. म्हणूनच म्हणतात, की बऱ्याचशा घटनांमध्ये कुटुंबच पक्ष असतो, मात्र भाजपमध्ये पक्षच कुटुंब आहे' असं मोदी म्हणाले. ते महाराष्ट्रातील भाजप कार्यकर्त्यांशी 'मेरा बूथ सबसे मजबूत' या कार्यक्रमात संवाद साधत होते.

'भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. कार्यकर्त्यांनी तयार केलेला हा पक्ष देशाला समर्पित केला आहे. लोकशाहीच्या सिद्धांतांचं पालन करणारा जर कुठला पक्ष असेल, तर तो म्हणजे भाजप. लोकशाही आपल्या संस्कारांमध्ये आहे' असंही पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले.

'भाजप कायमच भारताच्या लोकशाहीच्या संरक्षणासाठी पुढाकार घेत आला आहे. आमचे कार्यकर्ते लोकांच्या हिताची लढाई लढत आहेत. मी संवाद साधल्याने प्रत्येकाला आपापला बूथ मजबूत करण्याची प्रेरणा मिळेल आणि प्रत्येक जण आपापल्या बूथमधील कुटुंबांशी संवाद साधून आपल्या संकल्पाला बळकटी देतील' असा विश्वासही मोदींनी व्यक्त केला.