मुंबई : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मला दरवर्षी दोन कुर्ते आणि मिठाई पाठवतात, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनेता अक्षयकुमारला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. विरोधी पक्षातील नेत्यांशी असलेल्या वैयक्तिक संबंधांबद्दल त्यांना अक्षयने प्रश्न विचारला होता.  काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांच्यासोबतही मैत्रीपूर्ण संबंध असल्याचे त्यांनी सांगितले. हे सांगितल्यामुळे मला राजकीय फटका देखील बसू शकतो असेही मोदी यावेळी म्हणाले.




पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात नेहमीच आरोपप्रत्यारोप सुरु असतात. नोटबंदी, जीएसटी, छापेमारीच्या विषयांवरून ममता दीदींनी मोदींवर अनेकदा प्रहार केला आहे.

यावर बोलताना मोदींनी ममता बॅनर्जींविषयीचा हा किस्सा सांगितला. यावेळी मोदी म्हणाले की, राजकारणात माझे अनेक मित्र आहेत. विरोधी पक्षातील लोकांशीही माझे मैत्रीपूर्ण संबंध आहेत, असे त्यांनी सांगितले. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना देखील मला वर्षातून तीन ते चार वेळा ढाका येथून मिठाई पाठवतात. ही गोष्ट जेव्हा ममता बॅनर्जींना समजली तेव्हापासून त्या देखील मिठाई पाठवू लागल्या, असे त्यांनी सांगितले.

मी कधी पंतप्रधान होईन असे वाटलेही नव्हते. मी सर्वसामान्य कुटुंबातून आलो आहे. माझी कौटुंबिक पार्श्वभूमी पाहता मला एखादी नोकरी मिळाली असती आणि माझ्या आईने गावात साखर वाटली असती, असे मोदींनी सांगितले.

यावेळी मोदींनी विरोधी पक्षातील अनेक नेत्यांशी आपले चांगले संबंध असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी कॉंग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांच्यासोबत बोलण्यावरून पत्रकारांना दिलेल्या उत्तराचा घडलेला किस्सा देखील सांगितला. मोदी म्हणाले की, मी पहिल्यांदा संसदेत गेलो होतो त्यावेळी गुलाम नबी आझाद यांच्याशी गप्प मारत होतो. त्यावेळी पत्रकारांनी 'तुम्ही आरएसएसचे असूनही गुलाब नबी आझादांशी मैत्री कशी काय?' असा प्रश्न केला होता. त्यावेळी गुलाम नबी आझाद यांनी तुम्ही बाहेर जे बघता तसं  इथं चित्र नाही. आम्ही इथं एका कुटुंबासारखं राहतो, असे आझाद म्हणाले होते, असे मोदी यांनी सांगितलं.